सावंतवाडीतील धोकादायक झाडांचे त्वरित सर्वेक्षण करा

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकीचं निवेदन
Edited by: विनायक गावस
Published on: October 06, 2023 19:57 PM
views 178  views

सावंतवाडी : शहरातील खाजगी व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर व घरांवर झुकलेली धोकादायक झाडे तोडून घेण्यासाठी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी साथ देणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडांचे त्वरित सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी यांनी आपली साथ लाभली तर आणखी काम सोपं होईल आपली साथ आम्ही नक्कीच घेऊ कारण शहरात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये धोकादायक झाडांचे सर्वेक्षण होईल त्यानंतर धोकादायक झाडे तोडले जातील असं ते म्हणाले. तर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या दुर्घटना घडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी तळमळीने काम करत आहे. अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या मदतीला धावणार आहे अशी ग्वाही सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

याबाबतची निवेदने सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी महसूल देण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे सतीश बागवे,रवी जाधव, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, समीरा खलील, हेलन निब्रे, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते.