
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच ही सभा जिल्ह्यात होत असून सभेला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या यशस्वीतेसाठी कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच सावंतवाडी येथे पर्णकुटी विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली.
२० सप्टेंबर रोजी कुडाळ येथील मराठा मंडळाच्या सभागृहात सकाळी ११.४५ वाजता होणाऱ्या प्रांत विभागाच्या वार्षिक सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. या सभेला प्रांताध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आणि विश्वस्त रमेश कीर यांच्यासह प्रांताचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सभेला जवळपास दीडशेहून अधिक सभासद उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने, प्रत्येक तालुक्यात नियोजन बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्व आजीव सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मस्के यांनी केले आहे. नवीन शाखांची स्थापना आणि युवा साहित्यिकांचा सहभाग जिल्ह्यात साहित्य चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी ज्या तालुक्यांमध्ये परिषदेच्या शाखा नाहीत अशा ठिकाणी नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दोडामार्ग, वेंगुर्ले, देवगड आणि कसाल-ओरस या चार ठिकाणी लवकरच बैठका घेऊन जुन्या सदस्यांना एकत्र करून नवीन शाखा गठित केल्या जाणार आहेत. याशिवाय, युवा साहित्यिकांची संख्या वाढवून प्रत्येक तालुक्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचा युवा साहित्य विभाग तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
कुडाळ येथील वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर, जिल्ह्यातील परिषदेच्या सदस्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बैठकीत वृंदा कांबळी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच, कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सदस्य डॉ. श्रीपाद कशाळीकर आणि राज्यातील साहित्य क्षेत्रातील व्यक्तींच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव ॲड. संतोष सावंत, खजिनदार अनंत वैद्य, सहसचिव सुरेश पवार, माधव कदम, वृंदा कांबळी, विठ्ठल कदम, भरत गावडे, अभिमन्यू लोंढे, गणेश जेठे, दीपक पटेकर, राजू तावडे, निलेश ठाकूर आदी उपस्थित होते. सचिवांनी आभार मानून बैठकीची सांगता केली.










