
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील माहू गावातील मृणालिनी दिनकर हुंबरे हिने आशिया खंडातील अग्रगण्य असणारे विद्यापिठ फुदान इंटरनॅशनल समर स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे माध्यमातून चिन शांघाय येथे पंधरा दिवसाचा अभ्यासक्रम नुकताच पुर्ण केला आहे. भारतातून यावेळी सहभागी झालेली ती एकमेव विद्यार्थींनी असल्याने या अभ्यासक्रमासाठी जगातून उपस्थित राहीलेल्या विद्यार्थ्यांशी भारताचा प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधला.
मृणालिनी सध्या केरळ राज्यातील केरळ अँग्रीकल्चर युनिव्हर्सिटी त्रिशूर या कृषी विद्यापिठात सॉईल अँण्ड वॉटर कन्जर्वेशन म्हणजे माती व पाणी संवर्धन, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि पाण्याचा शाश्वत वापर व साठवण करण्यासाठीच्या पद्धती या विषयात पि.एच.डी. पुर्ण करीत आहे. तिने दापोली येथे बी.टेक पदवी संपादीत केली असून बिहार येथील समस्तिपूर येथून एम.टेक. पदवी प्राप्त केली आहे. सध्या तिचे पीएच.डी. संशोधन कार्य चालू असून मशीन लर्निंग आणि SWAT वापरून प्रवाह (Streamflow) व गाळ उत्पादन (Sediment yield) यांचे अंदाज वर्तविणे या विषयात संशोधन सुरु आहे. 20 जुलै 2025 रोजी ती चिन शांघाय येथे जाऊन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत तिने इव्होल्यूशनरी अँड बायोलॉजिकल बिग डेटा हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असून, एकूण ३६ क्रेडिट तास पूर्ण केले असून प्रमाणपत्र मिळवीले आहे. मंडणगड सारख्या तालुक्यातून तिने करियर करण्यासाठी निवडलेली वेगळी वाट निश्चीतच कौतुकास्पद आहे.
या अभ्यासक्रमाचा उपयोग तिला मास्टर्स पि.एच.डी व सी.व्ही मध्ये होणार आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येने स्वतःचे धैर्य व धाडसाने चोखाळलेली वेगळी वाट अन्य विद्यार्थ्यांकरिता प्रेऱणादायी आहे. अत्तापर्यंत तिने हैद्राबाद, केरळ, गुडगाव, मध्यप्रदेश अशा विविध राज्यात प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन आपल्या कार्य कतृत्वाचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थी दशेतच तिने कौतुकास्पद व इतरांना प्रेरणादाई ठरेल अशा यशास गवसणी घातल्याने पुर्ण तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.