महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण करा

नारायण राणेंनी घेतली नितीन गडकरींची भेट
Edited by:
Published on: June 28, 2024 06:29 AM
views 157  views

कणकवली : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत  पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली. 

महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात यावेळी निर्णय झाला. गणेश चतुर्थी पर्यंत हे काम पूर्णत्वास नेले जाईल अशा पद्धतीची यावेळी चर्चा करण्यात आली.

नारायण राणे हे खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम  प्राधान्य देऊ पूर्णत्वास नेणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार खासदार श्री.राणे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात चर्चा केली.  दरम्यान नितीन गडकरी यांनी या प्रश्नावर जातीनेशी लक्ष घालून रत्नागिरी मधील अपूर्ण असलेले काम पूर्ण करू तसेच चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमाणात राहिलेले काम सुद्धा पूर्णत्वास नेले जाईल. व पत्रा देवी ते राजापूर पर्यंत रस्ता दुतर्फा सुशोभीकरण कामही सुरू केले जाईल अशी ग्वाही दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास न्यावे यासाठी असणारा अडचणींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक चर्चेतून महामार्ग चौपदरीकरणाचे काम यापुढे जलद गतीने सुरू होईल. नागरिकांचे, प्रवाशांचे होणारे हाल संपतील असा विश्वास निर्माण झाला आहे.