येवा, कोकण आपलाच आसा..!

Edited by:
Published on: May 19, 2025 15:42 PM
views 83  views

रवींद्र ओगले यांचा खास लेख 

पंचाहत्तरी ओलांडलेली आणि सावंतवाडीच्या आर्थिक उलाढालीशी कमी अधिक प्रमाणात कधी काळी सहभागी असलेली सावंतवाडी अर्बन सहकारी बँक अखेर ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) विलीन झाली. प्रदीर्घ काळ चाललेल्या विलीनीकरणपूर्व कार्यवाहीनंतर दि. १३ मे २०२५ रोजी सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलीनीकरण प्रक्रियेचा सोपस्कार सावंतवाडीत छोटेखानी उद्घाटनाने एकदाचा पार पडला आणि याचवेळी सावंतवाडी अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयासह नऊ शाखांचे टीजेएसबी या बँकेच्या नावाने कामकाज सुरू झाले.

खरं तर सावंतवाडी अर्बन बँकेची नामोनिशाणी मिटताना बँकेच्या अंदाजे बारा हजार भागधारकांची सुमारे नऊ - दहा कोटी रूपयांची भागभांडवल रक्कमही बुडाली. सुमारे तीन कोटी रकमेचे राखीव व अन्य निधी बुडाले. बँकेची सावंतवाडी येथील इमारत तसेच कुडाळ, कणकवली या शाखा इमारती मिळून एक कोटी पेक्षा अधिक पुस्तकी रकमेच्या मालमत्तांवर पाणी सोडावे लागले. या मालमत्तांची बाजारभावानुसार किंमत पुस्तकी किंमतीपेक्षा किमान चार - पाचपट तरी अधिक असावी. त्याशिवाय फर्निचर वगैरे अन्य बाबींची सुमारे एक कोटी रक्कमही वाया गेली. गेल्या पंचाहत्तर वर्षांत पै - पै  गोळा करून जमा केलेल्या व उभारलेल्या वा शिल्लक असलेल्या सामग्रीपोटी, निधीपोटी साधारणपणे पंधरा कोटी रूपये मूल्य, बँकेच्या सभासदांनी म्हणजे पर्यायाने बँकेने गमावले. त्यामुळे विलीनीकरण हे गोंडस नाव अर्बन बँक व्यवस्थापनाने वापरले तरी मोकळेपणाने म्हणायचे तर ही बँक सभासदांबरोबर बुडाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नाही म्हणायला टीजीएसबी बँकेने उद्घाटन कार्यक्रमाआधी सावंतवाडी नजीकच्या  एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या इमारतीत अर्बन बँकेच्या संचालक मंडळाला शानदार  मेजवानीप्रसंगी अल्प स्वल्प भेटवस्तू देऊन गौरविले त्यातून सभासदानीही आपले समाधान मानायला हरकत नाही.

बँकेवर आर बी आयचे निर्बंध लागू झाल्यापासून बँकेच्या पाच लाख रकमेच्या आतील ठेवीदारांना नियमाप्रमाणे डीआयजीसी कडून (विमा कंपनी) जवळपास पंचवीस कोटींच्या ठेवीची रक्कम कालांतराने  मिळाली तर पाच लाख रकमेवरील ठेव रक्कम ठेवीदारांना अद्याप मिळायची आहे. तीन - चार कोटींच्या घरात ही रक्कम असावी. टीजेएसबी बँक संबंधित ठेवीदारांना ठेव रक्कम देणार आहे म्हणे. बँकेकडे, सभासद येणे कर्ज सात कोटीच्या घरात आहे. या रकमेची वसुली अर्थातच टीजेएसबी बँकेकडे जाणार. अर्बन बँकेच्या ताळेबंदाचा एकूणच लेखाजोखा पहाता तसेच मालमत्ता व दायित्व यांचा सम्यक विचार करता सभासदांचे भागभांडवल बुडवून वा अन्य कोट्यवधी रूपयांची मालमत्ता पणाला लावून अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने कोणाचे हित साधले हा प्रश्न निर्माण होतो.

आर बी आयने वारंवार सूचना करूनही बँक कामकाजात आर बी आय नाॅर्मप्रमाणे संचालक मंडळाने सुधारणा केली नाही. इतकेच नव्हे तर आरबीआयने सुधारणांसाठी मुदतवाढ देऊनही कामकाज उंचावले नाही हे कोणते लक्षण समजायचे? राज्याचे सहकार खाते नेमके काय करते? एकूणच  या कर्मदरिद्रीपणाचा फटका प्रामुख्याने गोरगरीब सभासदांना बसला आहे. यासंबंधीच्या विशेष सर्वसाधारण सभेत वा वार्षिक सभेतही बँक वाचविण्याची धडपड, तगमग संचालक मंडळाची दिसली नाही. केवळ आरबीआयकडे बोट दाखविण्यात ही संचालक मंडळी आघाडीवर होती. बँकेच्या विलीनीकरणासंबंधी नेमका काय करार झाला आहे, किंवा विलीनीकरणासाठीच्या आर्थिक बाबी कशा काय ठरविल्या आहेत याबाबतचा सविस्तर तपशील या सभांमधून मागणी करूनही वा त्यानंतरही सभासदांना देण्याची गरज संचालक मंडळाला वाटली नाही. त्यामुळे एकूणच कार्यवाहीबाबत शंका घेण्यास वाव आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनीही बँकेच्या सहाय्यासाठी एक - दोन कोटी रूपये वा अधिक रक्कम ठेव अथवा भागभांडवल गुंतवणूक म्हणून हस्ते परहस्ते उपलब्ध करून दिल्याची चर्चा होती. हे खरे असेल व या रकमेवरही पाणी सोडावे लागणार असेल तर अशी अवस्था खूपच गंभीर आहे. आणि म्हणूनच विलीनीकरणासंबंधीची कार्यवाही पारदर्शकपणे होण्याची गरज होती.

टीजेएस बँकेने अर्बन बँकेच्या माध्यमातून तळकोकणात नऊ शाखांची दमदार आघाडी उघडली आहे. कोकणात सहकारी बँकींग व्यवसायात पाय रोवून उभं रहाणं तेवढसं कठीण नाही. बँकेच्या कामकाजाला या निमित्ताने शुभेच्छा ! मात्र, प्रश्न नाही सुटले तरी चालतील पण वर्षानुवर्षे आपणच संचालक असले पाहिजे अशा मनोवृत्तीची तीच तीच मंडळी असली किंवा मोठं नाव असलेल्या मंडळींपेक्षा नाव मोठं करणारी मंडळी नसली की ती "सावंतवाडी अर्बन बँक"  होते याचा धडा जिल्ह्यातल्या सहकारी चळवळीने घेण्याची गरज मात्र अधोरेखित झाली आहे.