चिमुकल्यांनी भरले रंग ; स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Edited by: विनायक गावस
Published on: November 20, 2023 21:05 PM
views 133  views

सावंतवाडी : एआय, मशिन लर्निंगच्या जमान्यात मोबाईलमध्ये बालपण हरपणार्‍या मुलांच्या जीवनात  रंग भरण्याचे काम सावंतवाडी पत्रकार संघ, आंबोली सैनिक स्कूल, सावंतवाडी नगरपरिषदने करत समाजासमोर चांगला पायंडा पाडला आहे. अशा उपक्रमासाठी मुलांच्या पाठीशी राहणार्‍या पालकांचेही मोठे कौतुक आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी व्यक्त केलेे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, आंबोली सैनिक स्कूल आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून बालदिनाच औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी आयोजित शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


या स्पर्धेत तब्बल दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन सैनिक बॅकचे कार्यकारी अधिकारी तथा आंबोली सैनिक स्कूलचे सचिव सुनील राऊळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सैनिक स्कूलचे संचालक जॉय डॉन्टस, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, उपाध्यक्ष हेमंत मराठे, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, राजेश मोंडकर, न.प. अधिकारी वैभव अंधारे, सैनिप पतसंस्थेचे श्री कविटकर, प्राचार्य एन.डी.गावडे, परीक्षक प्रा. रुपेश पाटील, गिरीश डिचोलकर, वैशाली खानोलकर, पत्रकार संघाचे सदस्य दीपक गांवकर, मंगल नाईक-जोशी, उमेश सावंत, शैलेश मयेकर, साबाजी परब, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे पुढे म्हणाले, सध्याच्या युगात मुले मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला अशा सर्व गोष्टी विसरली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या स्पर्धेच्या युगात मुलं फक्त मोबाईलमध्ये हरविण्याची भिती आहे अशा परिस्थितीसुध्दा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पालकांनी पुढाकार घेवून घेतलेला सहभाग हा कौतुकास्पद आहे. यावेळी सुनील राऊळ यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आंबोली सैनिक स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलांना सैनिक बनविण्याचे ट्रेनिंग देण्यासोबत घडविण्याचे काम करीत आहोत. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचे कलाकार घडणार आहेत. त्याचा फायदा मुलांना भविष्यात होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, या ठिकाणी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कूलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आपण कायम देवू.


दरम्यान जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, पत्रकार म्हणून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार कायम करीत असतो. परंतु त्या पलीकडे जावून अशा प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक काम करण्याचे काम सुध्दा पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे, हे कौतुकास्पद आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हरिश्चद्र पवार, सुत्रसंचालन विनायक गांवस तर आभार विजय राऊत यांनी मानले.