सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते-दहिवली येथे नर्सिंग कॉलेजला मान्यता

Edited by: मनोज पवार
Published on: August 17, 2024 02:43 AM
views 168  views

सावर्डे :   विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा येथेच उपलब्ध व्हाव्यात व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून  सह्याद्री शिक्षण संस्थेने आजपर्यंत इंजिनियरिंग, कृषि, कला वाणिज्य, विज्ञान यासारख्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधींचा लाभ जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना मिळत आहे. 'ज्योत ज्ञानाची दौलत राष्ट्राची' या ब्रीदवाक्या नुसार संस्थापक स्व. गोविंदराव निकम यांनी स्थापन केलेल्या  सह्याद्री शिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात खरवते-दहिवली येथे होत आहे.

आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी नुकतीच सह्याद्री शिक्षण संस्थेची सक्षमता तपासणी केली. या तपासणीमध्ये नर्सिंग कॉलेजसाठी आवश्यक इमारत, फर्निचर, पुरेसे क्रीडांगण, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असणारे शैक्षणिक वातावरण इत्यादी सर्व  बाबींबाबत तपासणी पथकाने समाधान व्यक्त केले.  महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्याकडून सह्याद्री शिक्षण संस्थेला संस्थेच्या खरवते दहिवली या ठिकाणी सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या महाविद्यालयाची सुरुवात करण्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या व महाराष्ट्रात नामांकित अशा सह्याद्री शिक्षण संस्थेकडून या वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात अत्यंत दिमाखदार पद्धतीने होणार असून वैद्यकीय क्षेत्रात कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण असलेले विद्यार्थी येथे तयार होतील . तरी  विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून  आपले भावी आयुष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम यांनी केले आहे.

----मनोज पवार-चिपळूण-----