सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानाला आज दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वत: रानबांबुळी, कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, येथील मतदान केंद्राला भेट देवून मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बंदोबस्तावरील पोलीसांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. स्वत: जिल्हाधिकारी अनिल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वेबकास्टिंगच्या माध्यमामातून जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मतदानाच्या या उत्साहात ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्तीं, नवमतदार उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या, तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.