
कुडाळ : कुडाळ तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननांना विरोधात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कडक भूमिका घेतली असून स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सोनवडे येथे नदीपात्रात असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्यांवर कारवाई करून पाण्यात बुडवण्यात आल्या आहेत.
करली नदीपात्रात कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन केले जात आहे आणि वाळू वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडला जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी खडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी वाळू माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या धडक मोहिमेदरम्यान कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथे केल्या जाणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी टीमसह उपस्थित राहून कारवाई केली. या ठिकाणी असलेल्या वाळू ने भरलेल्या दोन होड्या ताब्यात घेतल्या आणि त्या नदीपात्रात बुडवल्या. या कारवाई वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.