शाळेच्या इमारतीचं कोसळलं छप्पर | लोकप्रतिनिधींकडे आहे उत्तर..?

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 08, 2023 17:17 PM
views 291  views

मालवण : मालवण कट्टा येथील  केंद्रशाळा कट्टा नं. 1 ची इमारत ही मोडकळीस आली असून त्या इमारतीचे छप्पर कोसळले आहे. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. येथील लोकप्रतिनिधींनी गावचा विकास करण्याऐवजी गाव भकास केला आहे. छप्पर कोसळून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल करत, प्रशासनाने  इमारतीच्या छप्पराची दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख देवदास रेवडेकर यांनी दिला. 

यावेळी ठाकरे गटाचे ग्रा.प. सदस्य वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगूत, शेखर रेवडेकर, जगदीश मोरजकर, गणेश गाड, सुरेंद्र बोडये, निखील बांदेकर, संकेत अमरे व अन्य पालक उपस्थित होते. 

कट्टा केंद्रशाळेची इमारत ही फार जुनी आहे. तरीही इमारत मात्र मजबूत आहे. पण इमारतीचे छप्पर काही काही ठिकाणी मोडकळीस आले आहे. तर काही वर्गखोल्यांचे छप्पर कोसळले आहे. यामुळे इमारतीसही धोका निर्माण होऊ शकतो. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले जाते. मग एवढ्या लहान लहान मुलांच्या बाबतीत जर अपघात घडला तर याला जबाबदार कोण ? पालकांनी आणि आम्ही याचा जाब नेमका कुणाला विचारायचा कारण सत्ताधारी बोट दाखवणार अधिकाऱ्यांकडे आणि अधिकारी अडकलेले असणार कागदपत्रांमध्ये मग करायचे काय. पावसाळ्यापूर्वी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे होते.

पण सत्ताधाऱ्यांनी मात्र याबाबत गांभीर्याने विचार न करता सुशेगात राहिले. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यात सोसाट्याचा वारा सुरू असतो जर काही अघटीत घटना घडली तर सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांविरोधात  तीव्र आंदोलन छेडू. तातडीने यावर उपाययोजना करा आणि कार्यवाही करा. ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली ती नेमकी कशासाठी जनतेची कामे करण्यासाठी की भाजपचा हात धरून चालणाऱ्या ठेकेदारांची पोट भरण्यासाठी असा सवाल शाखा प्रमुख रेवडेकर यांनी केला.