
मालवण : पावसाने उघडीप घेतल्यानंतर कालच समुद्री पर्यटन सुरु झाल्यावर काही तास होत नाही तोवर आज पुन्हा एकदा पावसाचे ढग तयार झाल्याने शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायिकांची बोबडी वळली आहे.
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार आज पुन्हा एकदा पावसाचे ढग तयार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच पावसाने उघडीप घेतल्याने मालवणच समुद्री पर्यटन सुरु झाले होते. पाऊस गेल्याने साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. काल रात्री दव पडल्याने थंडी सुरु होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण सुरु झाले. आता तरी व्यवसाय सुरु होईल अशी अपेक्षा ठेऊन बसलेल्या मच्छिमार, शेतकरी, पर्यटन व्यवसायिकांची पाचावर धारण बसली आहे.










