
कुडाळ : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामपंचायत परबवाडा-पाट यांच्या वतीने आज कार्यक्षेत्रातील श्री देवी माऊली मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गावातील धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुंदर रहावीत, या उद्देशाने ग्रामपंचायत परबवाडा-पाट यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या स्वच्छता मोहिमेसाठी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (नि.श्रे.) मा. श्री. प्रफुल्ल वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरातील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) श्री. एम. जे. खरात आणि विस्तार अधिकारी (कृषी) श्री. संदेश परब यांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.
गावाच्या सरपंच सौ. साधना समाधान परब यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका, सी.आर.पी. (CRP) महिला, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून केलेल्या श्रमदानामुळे मंदिर परिसर 'चकाचक' झाला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










