
देवगड : देवगड येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थळ परिसराची साफसफाई करून मुलांना जांभेकर यांच्याविषयी माहिती दिली. सलग सातव्यावर्षी हा यशस्वी उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती व्हावी यासाठी राबविण्यात आला.
वैचारिक स्वच्छतेसाठी प्रयत्न अलीकडे सर्वत्र पाश्चात्य संस्कृती साजरी करत असतांना देखील मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल तरुणाईला माहिती व्हावी यासाठी परिसर स्वच्छते बरोबरच वैचारिक स्वच्छता महत्वाची आहे. हा वेगळा आदर्श श्रावणी आणि मेधांश कंप्यूटर कासार्डेच्या विद्यार्थ्यानी घालून दिला आहे. या दोन्हीही संगणक प्रशिक्षण संस्था आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार नेहमीच सामाजिक बांधिलकीचे बीज रुजवण्याच्या प्रयत्नाने सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतात आणि यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. व्यसनमुक्ती कार्यात संचालिका सौ.श्रावणी मदभावे यांनी विलोभनीय कार्य करत असताना हाही उपक्रम तितकाच कौतुकास्पद आहे. ३१ डिसेंबर जगभरात सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये बहुतांश कार्यक्रम पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे साजरे होताना दिसतात. या अशा कार्यक्रमांना तोड देणारा आणि युवा नेतृत्व घडवणारा म्हणून हा कार्यक्रम ओळखला जाऊ लागला आहे. केवळ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी जाऊन दर्पण सभागृह परिसराची साफसफाई करतानाच या पिढीला जांभेकर यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेतील कर्तुत्व समजावे यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आणि विद्यार्थ्यांना नवीन वर्षा बाबत मार्गदर्शन संजय भोसले, प्रा. हेमंत महाडिक, दत्तात्रय मारकड, उदय दुदवडकर यांनी केले. यावेळी श्रावणी कंप्यूटर तळेरे आणि मेधांश कंप्यूटर कासार्डे च्या विद्यार्थ्यानी आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक परिसराची स्वच्छता करून वनभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन आलेल्या पाहुण्यांनी केले. त्यानंतर स्वतः व्यसनी होणार नाही आणि समाज, राज्य, देश व्यसनमुक्ती होण्यासाठी सदैव कार्यरत राहीन, अशी उपस्थित सर्व मुलांनी आणि मान्यवरांनी शपथ घेतली.
या कार्यक्रमाला दर्पणकारांचे वंशज सुधाकर जांभेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे पदाधिकारी उदय दुधवडकर, दत्तात्रय मारकड, संजय खानविलकर, संजय भोसले, निकेत पावसकर, प्रा. हेमंत महाडिक, सतीश मदभावे, चित्रकार अक्षय मेस्त्री, तंबाखू प्रतिबंध अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ.श्रावणी मदभावे, गौरी सारंगे, स्मितेश पाष्टे, शुभम परब, प्रणाली मांजरेकर यांच्यासह सुमारे विविध भागातील 30 विद्यार्थी उपस्थित होते. गेली सहा वर्षे स्वच्छता अभियान राबवून निव्वळ उपक्रम साजरा न करता विद्यार्थ्यांमध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीचे बीज रुजवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य या माध्यमातून होत आहे. हि सामाजिक पिढी घडविण्याचे कार्य निश्चितच इतरांनाही अनुकरणीय आहे, असं मत बाळशास्त्री जांभेकर यांचे पाचवे वंशज सुधाकर जांभेकर यांनी व्यक्त केलं.