स्वच्छता ही सेवा ; 24 सप्टेंबरपासून उपक्रम

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 21, 2023 18:53 PM
views 168  views

ओरोस : "स्वच्छता हि सेवा" अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालय व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या कालावधीत करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2023" उपक्रम राबविण्यात येत आहेत. "स्वच्छता ही सेवा 2023" ची संकल्पना " कचरा मुक्त भारत" ही  आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (SUP) वापर व दुष्यपरिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कच-यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविणेत येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करुन स्वच्छतेचे उपक्रम राबविणेत येणार आहेत.

दिनांक 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात स्वच्छता हि सेवा अंतर्गत सर्व शासकिय कार्यालये व कार्यालय परिसर स्वच्छ करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती  श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री साधनार संवाद

स्वच्छता हि सेवा पंधरवडा कालावधीमध्ये सुरु असना-या दैंनदिन उपक्रमाना गती देण्याकरीता मा. ना. गुलाबराव पाटील, मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26/09/2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 वा. या कालावधीत "स्वच्छता संवाद" कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत 100 टक्के हागणदारी मुक्त अधिक (ODF+)  झालेला जिल्हा म्हणून श्री. प्रजित नायर,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याशी मंत्री महोदय ऑनलाईन संवाद साधणार आहेत. तसेच सर्व सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

"सफाई मित्र सुरक्षा दिवसांचे" आयोजन

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत स्वच्छता हि सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामिण भागात स्वच्छतेसाठी काम करणा-या कर्मचा-याचा योग्य सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचा-याच्या बाबतीत सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणी त्याचा कामापासुन अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी दिनांक 25/09/2023 रोजी स्वच्छता हि सेवा अंतर्गत "सफाई मित्र सुरक्षा दिवसांचे" आयोजन करण्यात येणार आहे.