कुडाळ नगरसेवकांची प्रशासना विरुद्ध शाब्दिक चकमक !

अपहार तर नाही ना ? : नगरसेविका संध्या तेरसे
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 28, 2023 18:36 PM
views 91  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मालकीच्या 73 गळ्यांपैकी सहा गाड्यांचे भाडे नगरपंचायतला मिळत आहे. मात्र, कुडाळ ग्रामपंचायतची कुडाळ नगरपंचायत झाल्यापासून नगरपंचायत मालकीच्या 67 गाळ्यांचे अद्याप भाडे मिळाले नसल्याची धक्कादायकबाब कुडाळ नगरपंचायत विशेष सभेत समोर आली. यावर सर्व नगरसेवक विरुद्ध प्रशासन अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तर या 67 गाळ्यांचे भाडे कोणी घेतले आहे का? भाडे पावत्यांचे काय झाले ? असा सवाल उपस्थित करत यात काही अपहार तर नाही ना असा सवाल भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी उपस्थित केला.

कुडाळ नगरपंचायत विशेष सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेला नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू, सत्ताधारी नगरसेवक उदय मांजरेकर, मंदार शिरसाट, श्रुती वर्दम, आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, सई काळप, संतोष शिरसाट यांच्यासह भाजप नगरसेवक संध्या तेरसे, प्राजक्ता बांदेकर, निलेश परब, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायत मालकीचे भाडेतत्त्वावर देण्यात आलेले एकूण गाळे किती ? या विषयावर चर्चा होत असताना 67 गाळ्यांचे भाडे, या गाळ्यांची भाडेपावती, सादर करा अशी मागणी सर्व सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी केली असता याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून वेळ मागण्यात आला. मात्र, 67 गाळ्याबाबत प्रश्न विचारले असता या गाळे मालकांकडून अद्याप भाडे स्वीकारण्यात आले नसल्याची ही माहिती समोर आली. तर उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजप नगरसेवक निलेश परब यांनी जर तुम्ही पुनर्नरीक्षण कार्यक्रम आखून कुडाळ नगरपंचायतचा स्वनिधी वाढवण्यावर भर देत असाल आणि दुसरीकडे स्वतःच्याच मालकीच्या गाळ्यांच्या भाडे स्वीकारत नसाल तर यासारखे दुर्दैव काय ? असा सवाल उपस्थित केला. 

तर नगरसेविका संध्या तेरसे व प्राजक्ता बांदेकर यांनी नगरपंचायत मालकीचे सर्व गाळ्यांचे भाडे करार, एकूण जमा झालेले भाडे, याचा तपशील सादर करा अशी मागणी केली. यावर संबंधित अधिकाऱ्याने वेळ वाढवून मागितल्यावर सभा वादळी ठरली. जर सभेसमोर विषय ठेवतात तर त्या संबंधित दस्तावेज तयार का केला जात नाही असा प्रश्न सर्व नगरसेवकांनी उपस्थित केला.  नगरपंचायत स्थापन होऊन सात वर्षे उलटली तरी अद्याप 67 गाळ्यांचे भाडे कोण घेते ? या गाड्यांवर पोट भाडेकरू नेमण्यात आले आहेत का ? याची चौकशी करा अशी मागणी करत जर या भाडे प्रकरणात कोणी अधिकारी, कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी नगरसेविकास संध्या तेरसे व प्राजक्ता बांदेकर यांनी केली. तर हा विषय पुढील सभेत ठेवला जाईल. मात्र, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी विषय पत्रिकेवर विषय घेताना त्याची परिपूर्ण माहिती मला द्यावी, जर मलाच चुकीची माहिती दिली जात असेल तरी हे चुकीचे आहे. यापुढे कोणाची गय केली जाणार नाही असे मुख्यधिकारी अरविंद नातू यांनी सभागृहासमोर सांगितले.

दरम्यान,  नगरपंचायतच्यावतीने कुडाळ शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इंदोर शहरातील घनकचरा प्रकल्पाचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दौरा फक्त कुडाळ नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. याला आमचा विरोध नाही. मात्र, असे अजून किती अभ्यास दौरे करणार ? हे सांगा असा प्रश्न भाजप नगरसेवक निलेश परब यांनी उपस्थित केला. तर भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी या अभ्यास दौऱ्यात नगरसेवकांनाही समाविष्ट करा अशी मागणी केली. तर नगरपंचायत मालकीच्या ओपन स्पेस या विषयाचे वाचन सुरू असताना नगरपंचायत मालकीचे ओपन स्पेस किती ही आकडेवारी द्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी  42 ओपन स्पेस हे नगरपंचायत मालकीचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तात्काळ ओपन स्पेस अतिक्रमण झाले आहे का याची पाहणी करा अशी नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केली. तर याआधी या जागांबाबत अनेक ठराव झाले असून या ठिकाणी सूचना फलक लावण्यात अशी सूचना करण्यात आली होती. त्याचं काय झाले की सूचना फलकांचे बिल काढूनही मोकळे झालात का ? असा सवाल सर्व नगरसेवकांनी उपस्थित करत असे घडले असल्यास संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस काढा अशी मागणी केली.  नगरपंचायत मालकीचा 141 गुंठे जागेवर अतिक्रमण झाले आहे त्यामुळे या जागेचा फेरफार काढून जागा ताब्यात घ्या. जोपर्यंत हे सर्व होत नाही तोपर्यंत विनाकारण खर्च करू देणार नाही असे संध्या तेरसे यांनी सांगितले.

नगरपंचायत  एजन्सीच्या भरोशावर : भाजप नगरसेवक निलेश परब
कुडाळ नगरपंचायत झाडे लावणे, झाडांना पाणी लावणे,  मालकीच्या ओपन स्पेस सर्वे करणे, कंत्राटी पद्धतीने भरती करणे, कुत्र्यांचे निरबीजीकरण करणे यासह अन्य कामासाठी एजन्सी नेमणार असेल तर नगरपंचायत सर्व कारभारासाठी एजन्सी नेमा. कारण, मागील बहुतेक कामांसाठी नगरपंचायतचा कारभार एजन्सीच्या भरोशावर चालत आहे. अजून किती एजन्सी नेमणार ? असा सवाल भाजप नगरसेवक निलेश परब यांनी केला.

 नगरपंचायत हद्दीतील कुत्र्यांचे पुन्हा निर्बीजीकरण !
 कुडाळ नगरपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याबाबत आजच्या विशेष सभेत विषय वाचन करण्यात आले. याला सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली. तर याआधी नेमलेल्या एका एजन्सीवर पोलीस कारवाई सुरू असल्याचेही मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी सांगितले.