
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व जि. प. च्या आरोग्य विभागा अंतर्गत येणाºया सर्व रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना दार्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी काळजी घ्यावी. जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा रुग्ण कोल्हापूर व गोवा राज्यातील रुग्णालयांमध्ये 'रेफर' करावा लागणार नाही, अशी व्यवस्था सर्व रुग्णालयांमध्ये झाली पाहिजे, तेच आरोग्य व्यवस्थेचे खरे यश असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे अद्ययावत, २४ तास सी.टी. स्कॅन डायग्नोस्टिक्स सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, डॉ. तुषार चिपळूणकर, अनिलकुमार देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा इंगवले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, माजी नगरसेविका मेघा गांगण, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अजय गांगण, अण्णा कोेदे, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, पालकमंत्र्यांचे ओएसडी अजयकुमार सर्वगोड, कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, राजन परब, डॉ.विद्याधर तायशेटे, विजय चिंदरकर, प्रशांत बुचडे यांच्यासह आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सोयीसुविधांबाबत वैद्यकीय अधिकाºयांना विचारणा केली. रुग्णालयातील सध्या लिफ्ट बंद आहे, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित रुग्णालयातील प्रलंबित कामांबाबत मी स्वत: अधिकाºयांशी बोलणार असून ती कामे त्वरितपूर्ण करून घेतली जातील, असे सांगून कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवागृह सुरु करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रिश्ना डायग्नोस्टिक्स लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) सीटीस्कॅन डायग्नोस्टिक्स सेंटरचे सेवा चालू करण्यात आली आहए. या अद्ययावत मशीनद्वारे डोक्यापासून पायापर्यंतच्या तपासण्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सीसीस्कॅनसाठी रुग्णाला जिल्ह्याबाहेर हलवण्याची आवश्यकता भासणार नाही. हे केंद्र २४ तास, सातही दिवस सुरु राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जसे की स्ट्रोक मेंदूतील रक्तस्राव अशा स्थितीत त्वरित निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही सेवा रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत आहे. बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी अत्यल्प दरात सेवा उपलब्ध आहे.
सिटीस्कॅन मशिनचा रुग्णांनी लाभ घ्यावा : डॉ. श्रीपाद पाटील
मागील चार दिवस आम्ही सीटीस्कॅन मशिनचे टेस्टिंग करत होतो. त्यानंतर ही मशिन आता रुग्णसेवेस सज्ज झाली आहे. या मशिनमध्ये डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत सीटीस्कॅन करता येते. यात सिटीस्कॅनचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. सिटीस्कॅन अँजिओग्राफी देखील येथे लवकरच कार्यान्वित होईल. या सेवेचा जास्तीतजास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडियोलॉजिस्ट डॉक्टरची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, सिटीस्कॅन मशिनमुळे या अडचणी कमी होतील. ही मशिन कृष्णा डायग्नोस्टिक यांच्याकडून बसविण्यात आली आहे. त्यांचे पुण्यामध्ये रेडियोलॉजिस्ट असून त्यांच्याकडून आपणाला तपासणी केलेल्या रुग्णांचे चोवीस तासांमध्ये रिपोर्ट प्राप्त होणार आहेत. त्यानुसार येथील स्थानिक डॉक्टरांना उपचार करणे सोपे होणार आहे. ही मशिन चोवीस तास सुरु असणार आहे. ही सेवा नि: शुल्क असणार आहे असेही डॉ. पाटील यांनी सांगितले