
मालवण : मालवण शहराला प्रशासकीय राजवटीचा फटका बसला आहे. पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण रॉक गार्डन मधील म्युझिकल फाऊंटन, लहान मुलांसाठी असलेले बोटिंग बंद आहे. टॉयलेटचीही अपुरी व्यवस्था आहे. मंत्रालयाच्या चकरा मारून विकासकामे करायची अन् प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या कामांबाबत हेळसांड होते. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्तीकडे आहे. त्यावर कोणाचाही अंकुश नाही. याबाबत तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या रॉक गार्डनची दुरावस्था झाली आहे. पर्यटन निधीतून सुमारे 1 कोटी रुपये निधी मंजूर करून घेऊन म्युझिकल फाऊंटन कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक लोकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. परंतु मागील चौदा महिन्या पासून लोकप्रतिनिधीचा कालावधी संपून प्रशासक कालावधी सुरू झाला आणि रॉक गार्डनच्या या सुविधाकडे दुर्लक्ष झाले आहे.
मागील महिनाभर म्युझिकल फाऊंटन बंद आहे. त्याठिकाणची म्युझिक सिस्टिमही बंद आहे. त्यामुळे फाऊंटन बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
बोटींग वर्षभरापासून बंद अवस्थेत :
लहान मुलांसाठी बोट रायडिंग साठी दोन लहान तलाव बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी बोटींग पासून उत्पन्न पण मिळत होते. पण नादुरुस्त बोटीचे कारण सांगून बोटिंग मागील वर्षभर बंद आहे. जुन्या बोटी दुरुस्ती बाबत किंवा नविन बोटी खरेदीबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलांसाठी असणार एक मनोरंजनाचे ठिकाण कमी झालं. आणि या पासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने नगरपरिषदेच आर्थिक नुकसान सुद्धा झालं आहे.
प्रवेशफी गोळा करण्यात अनियमितता :
म्युझिकल फाऊंटन बसविल्यानंतर या ठिकाणी नाममात्र पाच रुपये प्रवेश फी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांच उत्पन्न मिळणं अपेक्षीत आहे. पण योग्य नियोजन नसल्याने लाखो पर्यटक भेट देऊनही त्यामानाने फीची रक्कम प्राप्त झालेली नाही. आणि नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
टॉयलेटची अपुरी व्यवस्था :
येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत आहे. कायम स्वरूपी उपाययोजना करेपर्यंत मागील दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या, आणि दुरुस्ती देखभालचे टेंडर न केल्याने बंद असलेल्या बायोटॉयलेट गाड्यापैकी एक गाडी याठिकाणी ठेवण्याबाबत सूचना करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामूळे पर्यटकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आणि. पर्यायाने नगरपरिषदेची आणि पर्यटन दृष्ट्या मालवणची बदनामी होत आहे.
प्रत्येक लोकप्रतिनिधीनि आपापल्या कालावधीत आपापल्या परीने पर्यटनाच्या दृष्टीने हे रॉक गार्डन जास्तीत जास्त कसे आकर्षित दिसेल याबाबत मेहनत घेतली आहे. पण सध्या प्रशासक पदाच्या 14 महिन्याच्या कालावधीतील दुर्लक्षामुळे ही अशी दुर्दशा झालेली आहे. प्रशासक याना वेळोवेळी कळवून, निदर्शनास आणूनही ही परिस्थिती उद्भवली आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्तीकडे असल्याने आणि त्यावर कोणाचाच अंकुश नसल्याने सर्वच विकास कामाबाबत ही परिस्तिथी निर्माण झाली आहे.
कारंजा गेले सात आठ महिने बंद :
पिंपळपार येथे असलेला कारंजा गेले सात ते आठ महिने बंद आहे. त्याच प्रमाणे गेट तुटून पडले आहे, लाईट बंद पडल्या आहेत. याबाबत सूचना देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही. मालवणच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करायचे, मंत्रालयाच्या चकरा मारून आपल्या आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध घेऊन विकासकाम करायची आणि प्रशासकीय राजवटीत जर प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे, हम करेसो कायदा अश्या प्रकारे मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या विकास कामाच्या दुरुस्ती देखभाली बाबत हेळसांड पणा होत असेल तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यामूळे या बाबत ज्या पालकमंत्री साहेबांच्या कालावधीत निधी मंजूर झाला आहे त्या पालकमंत्री याना या बाबी निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत. असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.