
सिंधुदुर्गनगरी : शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून 'सामाजिक न्याय विभागा' च्या योजनांची माहिती नागरिकांना मिळत असल्यामुळे पात्र लाभार्थी योजनांचा लाभ घेऊ शकणार असल्याचे कुडाळ-मालवणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे म्हणाल्या.
'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाला आज श्रीमती काळुशे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, नायब तहसिलदार श्री आढाव, श्री पवार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी श्री चिलवंत यांनी या चित्ररथाविषयी माहिती दिली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती श्री चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी श्रीमती काळुशे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.