
देवगड : 'सीआयएसएफ'च्या अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 'कोस्टल सायक्लोथॉन या मोहिमेंतर्गत काढण्यात आलेली सायकल रॅली २२ मार्च रोजी रत्नागिरीहून विजयदुर्ग किल्ला येथे येणार आहे. २३ मार्च रोजी पहाटे ५ वा. या रॅलीच्या पुढील प्रवासाला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. 'सुरक्षित तट, समृद्ध भारत' या संदेशासह भारताच्या ६,५५३ किमी लांब किनारपट्टीवर ही सायकल रॅली मार्गक्रमण करीत आहे.
'सीआयएसएफ'च्या 'कोस्टल सायक्लोथॉन या मोहिमेचा शुभारंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते ७ मार्च रोजी करण्यात आला होता. या मोहिमेत 'सीआयएसएफ'चे १२५ कर्मचाऱ्यांचे दोन संघ सहभागी झाले असून त्यात १४ प्रेरणादायी महिलांचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत व्यापारापासून सुरक्षिततेपर्यंत किनारपट्टी सुरक्षा आपल्यावर कशी परिणाम करते यासह भारतीय तटरक्षक व्यवस्थेतील नागरिक म्हणून आपले महत्व जाणून घेता येणार आहे. 'सीआयएसएफ'च्या नायकांच्या शौर्य आणि समर्पणाची प्रेरणा या मोहिमेतून मिळणार आहे. सायक्लोथॉनदरम्यान विविध ठिकाणी भारताचा समृद्ध वारसा साजरा करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असून 'सीआयएसएफ'च्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधण्याची, त्यांच्या कहाण्या ऐकण्याची आणि त्यांच्या ध्येयाची जाणीव करून घेण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.
ही सायकल रॅली केवळ एक शारीरिक आव्हान नसून ती राष्ट्रीय अभिमानाचा आणि सुरक्षा जागरूकतेचा संदेश देणारी एक ऐतिहासिक घटना आहे. ही सायकल रॅली २२ रोजी सायंकाळी ७ वा. पडेल कॅन्टीन येथून विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत जाणार आहे. तर २३ रोजी ही सायकल रॅली पुढील प्रवास सुरू करणार आहे. या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग घेऊन मोहिमेला नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.