फेस्त उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सज्ज

दरवर्षीप्रमाणे 'हर दिन आयुर्वेद - हर घर आयुर्वेद' अभियान
Edited by: विनायक गांवस
Published on: December 04, 2022 15:05 PM
views 189  views

सावंतवाडी : ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या नऊ वर्षापासून यावर्षीही भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी "हर दिन  आयुर्वेद - हर घर आयुर्वेद" हे अभियान राबवताना सर्व यात्रेकरूंना आयुर्वेदिक पेय देऊन आयुर्वेदाबाबत प्रबोधन करण्यात आले.

       ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसाची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासुन गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्यावतीने इलियास फर्नांडिस यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानून अशा अभियानाची गरज समाजास असुन आमच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा अंगीकार करू व प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले पेय दररोज आमच्या कुटुंबासाठी वापरू तसेच उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार घरी बनवून त्याचा वापर कायमस्वरूपी करून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी भारत बनविण्यात खारीचा वाटा नक्कीच उचलू अशी भावना व्यक्त केली.


 हर दिन  आयुर्वेद - हर घर आयुर्वेद"  

        स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत सरकारच्या आयुष विभागाच्यावतीने हर दिन  आयुर्वेद - हर घर आयुर्वेद" हे अभियान राबविण्यात येत असुन या यात्रेत आयुर्वेदाच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रतिष्ठानच्यावतीने सर्व यात्रेकरूंना दालचिनी, लवंग, सुंठी, मिरी, पिंपळी, अर्जुन, वेलची, सारीवा व जेष्ठमध असे घटक असणारे आयुर्वेदिक पेय व त्याचे माहिती देणारे पत्रक देऊन ते त्याचा उपयोग आणि वापर कसा करण्यासह ते कसे करावे याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

       यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, डॉ मुग्धा ठाकरे, भगवान रेडकर, अँड्र्यू फर्नांडिस, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅडेट प्रतीक आईर, प्रणय पालकर, स्वामीराज देसाई, सालस कामत, आशिष पित्रे यांनीही सहभाग घेतला.