चौकुळवासियांचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार

केसरकरांनी बाजूला रहाणं गावच्या हिताचं : सोमनाथ गावडे
Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2024 14:39 PM
views 153  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांचा आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांनी चौकुळ कबुलायतदार प्रश्नापासून पुर्णपणे बाजूला रहावं. तेच गावाच्या हीताचं राहील व ते सहकार्याच ठरेल. तर मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक होत असून या बैठकीला जाणाऱ्या लोकांना जमिनींची कोणतीही माहिती नाही. तरूण मंडळींना हाताशी धरून केसरकर बैठका घेत आहेत. बैठकीच अधिकृत पत्र आम्हाला आलेल नाही. त्यामुळे या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याची माहिती चौकुळ कबुलायतदार गांवकर कृती समितीचे सदस्य सोमनाथ गावडे यांनी दिली. तर १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला. 

ते म्हणाले, चौकुळ कबुलायतदार जमीनीसंदर्भात आम्ही 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसणार आहोत. 10 मे 1999 ला तत्कालीन युती सरकारने कोणतीही कल्पना न देता कबुलायतदार जमीनींचा 7/12 राज्य सरकारच्या नावे केला. गेली अनेक वर्षे आमची जमीन स्वमालकीची कशी आहे हे सिद्ध करणारे पुरावे आम्ही गोळा केलेत. आमच्या जमीनी भोगवटदार नं. 1 च्या जमीनी असल्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सरकारला पाठवलेला आहे. राज्य सरकारने जोरजबरदस्तीन त्या शासनाच्या नावावर केल्यात. त्यामुळे आमच्या जमिनी जोपर्यंत कबुलायतदार गांवकर खाते उतारावर वर्ग करत नाहीत तोवर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत अशी माहीती श्री गावडे यांनी दिली. 

तसेच सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांना आमची विनंती आहे. चौकुळ कबुलायतदार प्रश्नापासून त्यांनी पुर्णपणे बाजूला रहावं. हेच आमच्या गावाच्या हिताचं राहील व ते सहकार्याच ठरेल. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक होत आहे. या बैठकीला जाणाऱ्या लोकांना जमिनींची कोणतीही माहिती नाही. दिनेश गावडे हे नवखे आहेत. त्यांना या जमीनीच काहीही माहीत नाही. दीपक केसरकर तरूण मंडळींना हाताशी धरून बैठका घेत भ्रम निर्माण करत असून ते त्यांनी  थांबवाव असं आवाहन केलं. तर बैठकीच अधिकृत पत्र आम्हाला नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे स्पष्ट केलं. 

सैनिकच भुमिहीन...!

आमचं गाव हे सैनिकांच गाव असून राज्य सरकारने सैनिकांनाच भुमीहीन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. आमच्या स्वमालकीच्या जागा आहेत. केसरकर याबाबत भ्रम निर्माण करत आहेत. जोपर्यंत सातबारावर कबुलायतदार गांवकर अशी नोंद होत नाही तोवर आमचं उपोषण चालूच राहील असं सोमनाथ गावडे यांनी सांगितले. यावेळी अँड. संग्राम गावडे उपस्थित होते.