G - 20 शिखर परिषदेच्या स्वच्छता मोहिमेसाठी मालवणातील चिवला बीचला पसंती

Edited by: जुईली पांगम
Published on: May 19, 2023 17:04 PM
views 117  views

मालवण : जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून यात येथील चिवला बीच येथे २१ मे रोजी सकाळी ७ ते ९ वाजता स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली.

जी-२० शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांसह जगभरातील इतर १९ समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एकूण चार समुद्र किनाऱ्यांची निवड झालेली असून यात मालवण शहरातील चिवला समुद्र किनाऱ्याला पसंती देण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी चिवला समुद्र किनाऱ्याची झालेली निवड मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परीसंस्थेचे जतन करण्यासाठी जी-२० देशांमध्ये सामुहिक कृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.

शहरातील चिवला समुद्र किनारा येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मालवण नगरपरिषदेने केले असून या कार्यक्रमास केंद्र शासनाकडून जी -२० परिषदेचे अधिकारी शहरात उपस्थित राहणार आहेत. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी २१ मे रोजी सकाळी ७ ते ९ या कालावधीत होणाऱ्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेस सर्व मालवणवासियांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

गतवर्षी २०२२ साली झालेल्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे व सहकार्यामुळे शहराला देशपातळीवर केंद्र शासनाकडून गौरविण्यात आले होते.