
देवरुख : काल रात्री सुमारे दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास देवरुख येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर यांना अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून लुटले. हा प्रकार वांझोळे पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय केतकर हे रात्री साखरपा येथील घरगुती कार्यक्रम संपवून देवरुखकडे जात होते. वाटेत, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीची पाठलाग करून गाडी थांबवली आणि नुकसान भरपाई मागू लागली. या गडबडीत केतकर गाडीतून उतरले असता, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बुरखा टाकून जबरदस्तीने आपल्या गाडीत कोंबले आणि वाटूळजवळ नेले.
हल्लेखोरांनी केतकर यांच्याकडून सुमारे पंधरा लाखांच्या दागिन्यांसह रोख २० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना मारहाण करून सोडण्यात आले. घटनास्थळी पोलीस त्वरित पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपास सुरू झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवून तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी देवरुख परिसरात मार्लेश्वर फाट्याजवळ फिल्डिंग करून सहाय्यक तपास सुरू केला आहे.
या अपहरणामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून पोलीस हे गंभीरपणे घेऊन अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात इसमांविरुद्ध रजि. नं. १०४/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ३११, ३०९ (४), ३१० (१), १४० (२), १२७(२), ११५(२), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.