सावर्डे विद्यालयात हरित रक्षाबंधन

Edited by: मनोज पवार
Published on: August 11, 2025 16:04 PM
views 68  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय हरित सेनेच्या व इको क्लबच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम पार पडला. राष्ट्रीय हरितसेना विभागप्रमुख साजिद चिकटे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दृढीकरण व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राख्या तयार केल्या व त्या राख्या शाळेच्या परिसरातील वृक्षांना बांधल्या.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षांचे रक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली. झाडांना राख्या बांधून पर्यावरणातील घटकांविषयी स्नेह प्रकट करण्याचा संदेश मुलांनी दिला. हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण जतनाविषयीची जागरूकता वाढवणारा ठरला.