
चिपळूण : चिपळूण उपविभागात कायदा व सुव्यवस्थेचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदलांतर्गत प्रकाश वसंत बेळे (वय 57) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
बेळे यांची पोलीस सेवेतली कारकीर्द तब्बल 37 वर्षांची असून, 1 नोव्हेंबर 1988 रोजी मरोळ, मुंबई येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 साली वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. ती सांभाळत त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश घेतला व पदोन्नतीच्या टप्प्यांतून पुढे वाटचाल केली.
1994 ते 1996 दरम्यान भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर गोरेगाव येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) म्हणून जबाबदारी निभावली. 2003 साली ट्रॅफिक पोलीस विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्य केले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अलीकडे ते ताडदेव येथे सशस्त्र पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची बदली चिपळूण डीवायएसपी पदावर झाली आहे.
कुटुंबात पत्नी आणि विवाहित दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणि नागरिकांशी सुसंवाद वाढवण्यावर ते भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.