
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)ने चिपळूणमध्ये ताकद दाखवली. शनिवारी सायंकाळी शहरातील अतिथी हॉटेलमध्ये झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जोरदार भाषण करत, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात निवडणुकीत युती झाली तरी भगवा, नाही झाली तरीही भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला.
निवडणुका जाहीर होण्याआधीच सज्जतेचा इशारा
सामंत म्हणाले, "जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील. त्यामुळे एकही क्षण वाया घालवू नका." त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, "जे इच्छुक आहेत त्यांनी त्वरित सभासद व्हावे, कारण फार्म भरण्याच्या वेळी सभासद क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक असतो." तसेच, "फक्त स्वतः सभासद होणे पुरेसे नाही. आपल्या गावातील, प्रभागातील आणि संपर्कातील लोकांनाही सभासद करून घ्या." अशा शब्दांत त्यांनी व्यापक सदस्य नोंदणीवर भर दिला.
संघटनात्मक सुसूत्रता आणि प्रोटोकॉलच्या पालनावर भर देताना उदय सामंत यांनी सांगितले की, "गटप्रमुखांनी जिल्हाप्रमुखाचा मान राखावा आणि जिल्हाप्रमुखांनी गटप्रमुखाचा." त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "संघटनेत प्रत्येकाला सन्मान मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपली वर्तणूक योग्य असली पाहिजे."
चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे संपूर्ण नियोजन आपल्या खांद्यावर घेतले. एलईडी सिस्टीम, बैठकीची आसनव्यवस्था, ध्वनी आणि प्रकाश योजना, तसेच तांत्रिक व्यवस्थापन या सर्व गोष्टींची जबाबदारी त्यांनी पार पाडली. पालकमंत्री यांनी त्यांच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक करत म्हटले, "उमेश सकपाळ यांचे नेतृत्व चिपळूणसाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण नगर परिषद निवडणुका जिंकूया," यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.
ना. सामंत यांनी स्पष्ट सांगितले की, "उमेश सकपाळ यांनी दिलेल्या यादीप्रमाणेच पदाधिकारी नेमले जातील. मात्र निवडणूक प्रक्रियेतून ह्या नियुक्त्या व्हाव्यात, म्हणजे त्या पदाधिकाऱ्यांना त्या पदाचे महत्त्व व जबाबदारी समजेल." त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी संपर्क वाढवण्याचे व निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर नियोजन राबवण्याचे आदेश दिले.
या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, "कोणतीही अडचण आली, तर मी स्वतः तुमच्या मागे आहे. फक्त वेळेवर संपर्क साधा. मात्र सभासद नोंदणी ही आता तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे."
या बैठकीला शिवसेना सचिव किरण पावस्कर, राजापूरचे आमदार किरण सामंत, माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, संजयराव कदम, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, महिला आघाडीच्या रश्मीताई गोखले आणि शिल्पा सुर्वे, चंद्रकांत (अण्णा) कदम, विलास चाळके, माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, रोहन बने, युवा सेनेचे चेतन सातपुते आणि दर्शन महाजन, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, तालुका प्रमुख बापू आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत चिपळूणमधील युवा नेतृत्व धीरज नलावडे यांच्यासह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षात नवचैतन्य संचारले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शिंदे यांनी केले.
या बैठकीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाल्याचे स्पष्ट झाले. नेतृत्व, शिस्त, नियोजन आणि कार्यकर्त्यांचा जोश या चौफेर तयारीने शिंदे गट शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. भगवा झेंडा प्रत्येक गाव, प्रभाग, नगर परिषद आणि जिल्हा परिषद मुख्यालयावर फडकवायचा आहे, असा निर्धार या बैठकीतून स्पष्ट झाला.