
चिपळूण : शहरातून कोकण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अमेय पार्क ते मुरादपूर या मार्गावरील नागरिक व प्रवाशांना खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या गाड्या रेल्वे प्रवाशांचे ने-आण करत असतात, मात्र रस्त्याची मोडकळीस आलेली अवस्था जीवघेणी ठरत आहे. नऊ मीटर डी.पी. रस्त्याचा केवळ तीन मीटर वापरासाठी उरला असून, दोन्ही बाजूंनी अतिक्रमण व झाडी यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो आहे.
गुरुवारी शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अमेय पार्क ते मुरादपूर या मार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. अन्यथा "शिवसेना स्टाईल"ने उत्तर दिले जाईल, असा इशारा उमेश सकपाळ यांनी दिला.
“हा मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य दुवा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवसेना याप्रकरणी गप्प बसणार नाही,” असे सकपाळ यांनी ठणकावून सांगितले. या भागातील स्थानिक नागरिकांनी देखील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही उपाय न झाल्याचे सांगितले. आता शिवसेनेने पुढाकार घेतल्याने या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधले गेले आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.