
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आणि आमदार आदरणीय शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सक्षम तू’ या विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस सौ. दिशा दाभोळकर यांच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेरडी चिंचघरी सती येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात चिपळूण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. मीरा महामुनी व पोलीस हवालदार सौ. समिधा पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा योग्य वापर, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, टोल फ्री हेल्पलाईन नंबर, तसेच आत्मसंरक्षणाचे महत्व याबाबत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्या, अडचणी यावर योग्य तो प्रकाश टाकून, त्या अडचणींवर मात करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना, पोलीस यंत्रणेचा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या सत्रात आपल्या समस्या मांडत सुस्पष्ट चर्चा केली. यामुळे त्यांच्या अनेक शंका दूर झाल्या. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा आदितीताई देशपांडे, विधानसभा क्षेत्राध्यक्षा मनालीताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, प्रणाली दाभोळकर, रशिदा चौगुले, तालुका कार्यकारिणी सदस्य कोमल भोसले यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक वरेकर सर, उपमुख्याध्यापिका सौ. जगताप मॅडम, सूत्रसंचालक पवार सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेला भारतीय संविधानाची आकर्षक फ्रेम भेट देण्यात आली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणिवा वाढण्यास मदत झाली असून, ‘सक्षम तू’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न झाला, असे सर्वांनी मत व्यक्त केले.