गणपतीसाठी कोकण रेल्वेच्या जादा गाड्या सुरु करा

शौकत मुकादम यांची मागणी
Edited by: मनोज पवार
Published on: June 29, 2025 16:24 PM
views 79  views

चिपळूण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी कोकण रेल्वेने जादा गाड्या सुरु कराव्यात, अशी जोरदार मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. दुसरीकडे, कोकण रेल्वेच्या दैनंदिन नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्णतः भरलेले असून नव्या प्रवाशांना आरक्षण मिळवणे कठीण झाले आहे.

गणपती हा कोकणातील सर्वात मोठा सण असून या काळात मुंबईसह विविध शहरांमध्ये राहणारे लाखो चाकरमानी आपल्या गावी येतात. मात्र सध्या रेल्वे व रस्ते प्रवास या दोन्ही मार्गांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे चाकरमानींच्या हालाला वाचा फोडण्यासाठी कोकण रेल्वेने अतिरिक्त गाड्या सुरु कराव्यात, असे मुकादम यांनी स्पष्ट केले.

तसेच, या जादा गाड्यांच्या तिकीटांमध्ये कोणताही काळाबाजार होणार नाही यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांतून व्यक्त होत आहे.