
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या विद्यालयामध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हे यावर्षीच्या योग दिनाचे थीमवर योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
निरोगी व निरामय जीवनासाठी योग आवश्यक आहे. शरीराचे स्नायू लवचिक व तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमीच योग करणे गरजेचे असून शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांनी याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे व कुटुंबातील सभासदांना महत्त्व पटवून देऊन निरामय जीवनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी याप्रसंगी केले.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रोहित गमरे, अमृतकुमार कडगावे, योगेश नाचणकर, प्रशांत सकपाळ व दादासाहेब पांढरे यांनी योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवली.विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या उपस्थितीमध्ये सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, अर्धउष्ट्रासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन व शवासन इत्यादी आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्याचबरोबर प्राणायाम मध्ये कपालभाती अनुलोम-विलोम भ्रामरी या प्राणायामंचा समावेश होता . विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सहभाग होता .शेवटी संकल्प आणि शांतीपाठ घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाची सांगता झाली. सर्व उपस्थितांचे आभार विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अमृत कुमार कडगावे यांनी मानले.