LIVE UPDATES

Chiplun News : चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारी-सदस्यांमध्ये रंगली जुगलबंदी

रस्ते, एसटी व आरोग्य समस्यांवरून वातावरण तापले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 15:02 PM
views 47  views

​चिपळूण : अधिकाऱ्यांची वारंवार होणारी गैरहजेरी, लोकप्रतिनिधींना दिली जाणारी थातुरमाथुर उत्तरे, खोटे बोलणे आणि आठ-आठ महिने प्रलंबित राहणारे कामांचे प्रश्न, यावरून चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा जोरदार गाजली. रस्त्यांची दुरवस्था, एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता यांसारख्या गंभीर प्रश्नांवरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात अंकुश उरलेला नाही, हेच गेल्या आठ सभांमधील चित्रावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

चिपळूण पंचायत समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पंचायत समिती मासिक सभेचे आयोजन सभापती सूर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपसभापती संदेश आयरे, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. केळस्कर आणि सदस्य उपस्थित होते.

मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना वातावरण अतिशय तापले. सदस्या सुप्रिया वंजारे यांनी मार्गताम्हाणे कलमुंडी रस्त्याच्या खड्डांबाबत विचारले असता. खड्डे भरले म्हणून सांगितले. मात्र, सौ. वंजारे म्हणाल्या की, आम्ही स्वखर्चाने खड्डे भरले आहेत. अधिकारी निव्वळ खोटे बोलतात. यावर अधिकारी फक्त गप्प होते. तालुक्यातील सर्व रस्त्यांचा प्रश्न या सभेत मांडण्यात आला. यावर सदस्य विनोद झगडे यांनी सांगितले की, गेले आठ महिने हेच सुरू आहे. यांचे कार्यकारी अभियंता कधीच मासिक सभेत हजर राहत नाहीत. त्यामुळे या विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांची आपल्या सोबत एक संयुक्त सभा लावावी असे त्यांनी सभापती यांना सूचित केले.

या सभेत महसूल विभागाचे अधिकारी पुन्हा गैरहजर होते. यावर सदस्य श्री. झगडे यांनी सांगितले की, तहसीलदार मासिक सभेला उपस्थित राहत नाहीत का? यावर गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी सांगितले की, तहसीलदार यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पंचायत मासिक सभेला तहसीलदार म्हणून उपस्थित राहणे जरुरीचे नाही. सदस्यांच्या समस्या असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात आमच्याकडे द्याव्यात, त्या सोडविण्यात येतील. यावर सदस्य यांनी बीडिओ यांना विचारले की, तहसीलदार यांनी मासिक सभेला उपस्थित राहिले पाहिजे की नाही. मात्र, यावर सारवासारव करण्यात आली. शेवटी आपण सर्व सदस्य तहसीलदार यांच्याकडे जाऊ या असे सदस्य विनोद झगडे यांनी सांगितले. 

या नंतर एस टी आगराबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सदस्या मनस्वी बैकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तळवडे गाडी डेपोतून सुटली आणि तळवडे गावाकडे मार्गस्थ झाली तेव्हा टायरला फक्त चारच नटबोल्ड होते. चालक मधीच उतरून ते नट बोल्ड फिट करत गाडी घेऊन जात होता. याबाबत सभापती यांना माहिती दिली होती. जर यावेळी अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार. डेपोतून गाडी चेक केल्याशिवाय पाठवलीच कशी..असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. यापुढे असे होऊ नये याची दक्षता घ्या. 

त्यानंतर सदस्य सुभाष जाधव यांनी चिपळूण डेपो मधील शौचालयात पाणी नसते आणि शिवाजी नगर बसस्थानक असलेल्या स्वच्छतागृहाच्या दरवाज्यांना कडी कोयंडे नाहीत. कॉलेजला येणारी मुले या बसस्थानकात गाडीची वाट पाहत असतात. त्यांची गैरसोय होते. याबाबत वेळीच सुधारणा व्हावी..

कृषी विभागाचा आढावा घेताना दुष्काळ परिस्थितीचे नियोजन काय? आणि बंधारे किती बांधले याबाबत चर्चा करण्यात आली.

कामथे हॉस्पिटल बाबत सदस्य विनोद झगडे यांनी मुद्दा मांडला की, जनरल वॉर्डमधील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य दिसून येते. सफाई कामगार काय करतात. सदस्य श्री. भुरण म्हणाले की, पाण्याच्या प्रश्न ही त्या ठिकाणी गंभीर आहे. त्यामुळे त्वरित या गैरसोयी दूर कराव्यात आणि लोकांना उत्तम आरोग्याच्या सेवा मिळाव्यात. या नंतर उर्वरित विभागांचा आढावा घेण्यात आला. या सभेतही काही अधिकारी गैरहजर होते. यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदर सदस्यांचा अंकुश अधिकाऱ्यांवर नसल्याचे गेल्या आठ मासिक सभांमधून दिसून आले.