
चिपळूण : चिपळूण नगर परिषद कर्मचारीवृंद गणेशोत्सव समितीच्या ४५व्या वर्षातील गणेशोत्सवाचा प्रारंभ आज मंडपाच्या शुभारंभाने झाला. १९८० साली स्थापन झालेल्या या समितीने अनेक वर्षे सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणात भर घालत नगर परिषद परिवाराचा गणेशोत्सव साजरा केला आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार असून, त्यासाठी सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधींची जय्यत तयारी सुरू आहे. आज झालेल्या मंडप शुभारंभ कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष श्री. मंगेश पेढांबकर यांच्या हस्ते विधिवत सुरुवात झाली.
या वेळी समितीचे उपाध्यक्ष रोहित खाडे,अवधूत बेंद्रे, खजिनदार वैभव निवाते, सचिव रविकांत सातपुते तसेच सदस्य राजेंद्र जाधव, आनंद बामणे, सुजित जाधव, शिल्पा शेटे, निवेदिता आंबेकर, संगीता तांबोळी, दीपक निंबाळकर, महेश दळवी, सागर शेडगे, संचित जाधव, मोहन गोलांबडे, प्रविण नाईक, सुशील सकपाळ आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
युनियनचे अध्यक्ष श्री. बापू साडविलकर, मंडप डेकोरेटर्स साळवी यांच्यासह नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर होते. मंडप शुभारंभानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा आणि सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे रंग लाभले.
समितीने यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक पूजनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक जनजागृती उपक्रम आणि कर्मचारी मैत्री वाढविणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. नगर परिषद कर्मचारी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, कर्मचारी परिवारातील एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.