
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष तथा कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चिंतामणी शांताराम तोरसकर यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी २३ फेब्रुवारी सकाळी १० वाजता कोलगाव माध्यमिक विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोलगाव शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या चिंतामणी तोरसकर यांनी कळणे हायस्कूलमधुन सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकाऱ्यांना सोबत घेत कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या कोलगाव माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी सेवा बजावली. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष पद भूषविताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर कार्य केले. त्यांच्या या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे आजी-माजी पदाधिकारी, प्रशालेंचे आजी-माजी मुख्याध्यापक, कोलगावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.