नऊ कथांच्या नवरसात 'साहित्यप्रेमी' झाले चिंब

ओरोस येथील कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद
Edited by:
Published on: April 27, 2025 11:29 AM
views 20  views

सिंधुदुर्ग : 'घुंगुरकाठी'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब झाले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेला हा कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेला.

ओरोस खर्येवाडी येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला जम्मु काश्मीरमधील पहलगामजवळ बेसरन व्हॅली येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात ॲड. सुधीर गोठणकर, संध्या तांबे, वैदेही आरोंदेकर, डॉ. सई लळीत, सतीश लळीत, नम्रता रासम, मिताली मुळीक, अनिल रेडकर, पुरुषोत्तम लाडू कदम यांनी कथाकथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश लळीत यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागची भूमिका सांगितली.

 ते म्हणाले की, ओरोस येथे साहित्य चळवळ उभी करण्याच्या हेतुने स्थापन केलेल्या 'आम्ही साहित्यप्रेमी' या व्यासपीठाचे औपचारिक उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या व्याख्यानाने व मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या कविता गायनाने मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारीला झाले. त्यानंतर २७ मार्चला 'मला आवडलेले पुस्तक' या कार्यक्रमात दहा वक्त्यांनी विचार मांडले. या मालिकेतील आजचा हा तिसरा कार्यक्रम आहे. कथा हा मराठीतील अत्यंत समृद्ध साहित्यप्रकार आहे. त्यामुळे यावेळी कथाकथन हा विषय निवडण्यात आला. त्याला वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि नऊ वक्त्यांनी कथा सादर केल्या.

 या कार्यक्रमात ॲड. सुधीर गोठणकर यांनी 'न्याय निवडा' ही स्वलिखित कथा सांगितली. एका न्यायालयीन खटल्याबाबतच्या या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा शेवट करण्याचे काम वाचकांवर सोपवले होते. ज्येष्ठ लेखिका संध्या तांबे यांनी कुसुमावती देशपांडे यांची 'निर्धार' कथा कथन केली. गावात भुतांच्या कथा कशा पसरतात, याचे वर्णन करणारी द. मा. मिरासदार यांची 'भुताचा जन्म' ही विनोदी शैलीतील कथा वैदेही आरोंदेकर यांनी सांगितली. डॉ. सई लळीत यांनी 'भीमाक्का' ही स्वलिखित कथा सादर केली. निराधारांसाठी असलेल्या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी सरकारी कचेरीत गेलेली गरीब भीमाक्का शेजारणींचे दागदागिने, भरजरी साडी नेसुन जाते, अशी ही विनोदी पण शेवटी अंर्तमुख करणारी कथा रसिकांची दाद घेऊन गेली. सतीश लळीत यांनी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 'कोकणी ग वस्ती' या पहिल्यावहिल्या पुस्तकातील 'शांतु परुळेकराची दशावतारी पार्टी' ही कथा सादर केली. श्री. कर्णिक यांचा हा कथासंग्रह ४ मे १९५८ रोजी प्रकाशित झाला. त्यातील ही कथा दशावतारी कलावंतांची उपेक्षा, कलेसाठी खाल्लेल्या खस्ता यांचे वर्णन करणारी आहे. नम्रता रासम यांनी शंकर कऱ्हाडे यांची 'कलामांचे व्रत' ही माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा एक पैलू उलगडुन दाखवणारी कथा सादर केली. मिताली मुळीक यांनी बाबाराव मुसळे यांची 'बाकी वीस रुपयांचं काय करायचं?' ही काळजाला भिडणारी कथा कथन केली. श्री. अनिल रेडकर यांनी 'पडदेवाला' ही स्वलिखित कथा वेगळ्या शैलीत सादर केली. दशावतारी नाटकात युद्धात धारातीर्थी पडलेल्या पात्राला रंगमंचावरून चादरीचा पडदा उभा करुन प्रेक्षकांपासुन दुर नेणारा पडदेवाला त्यांनी नितांतसुंदरपणे रंगवला. पुरुषोत्तम कदम यांनी 'चामडी' ही श्रोत्यांना अंर्तमुख करणारी स्वलिखित कथा सादर केली.

कार्यकमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील ॲड. विलास पांगम यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिक्रीया व्यक्त केली. ते म्हणाले की, वेगवेगळ्या लेखकांच्या नऊ कथा ऐकताना खुप मजा आली. विशेष म्हणजे यापैकी तीन स्वलिखित कथा सादर झाल्या. या कथा अत्यंत दर्जेदार होत्या. अशा कार्यक्रमांमुळे रसिकांना उत्तम कथा ऐकायला मिळण्याबरोबरच स्थानिक कथालेखकांनाही व्यासपीठ उपलब्ध झाले. 'आम्ही साहित्यप्रेमी' उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रिया आजगावकर, सुरेश पवार यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी सर्व वक्त्यांना सत्यवान कदम व पुरुषोत्तम लाडू कदम यांनी 'डाझाईन अँड इटस् शॅडो' हा बळीराम कदम यांचा चरित्रग्रंथ भेट दिला. मनोहर सरमळकर यांनी कार्यक्रमाचा आढावा घेऊन आभार मानले.