पुढील वर्षी कोमसापच्या मदतीने जिल्हास्तरावर बालसाहित्य संमेलन!

प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची ग्वाही | मळेवाडच्या बालसाहित्य संमेलनात चिमुकल्यांनी आणली रंगत
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 04, 2023 17:23 PM
views 148  views

सावंतवाडी : कोमसाप सावंतवाडी  शाखेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये साहित्य संस्कृती रुजविण्यासाठी राबविलेली चळवळ निश्चितच कौतुकास पात्र आहे. आगामी काळात क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सवासोबत बाल साहित्य संमेलनाचेही आयोजन पुढील वर्षापासून करण्यात येईल, हा अत्यंत अभिनव प्रयोग असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कोमसापच्या सहकार्याने सदर उपक्रम आखण्यात येणार, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी दिली. मळेवाड येथे आयोजित बालसाहित्य संमेलनात शिक्षणाधिकारी धोत्रे मार्गदर्शन करीत होते.


कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व मळेवाड-कोंडुरा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मळेवाड प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन व बाल संसद भरविण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक वैष्णवी मुळीक, उद्घाटक म्हणून सुचिता सचिन कारुडेकर, तर प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, विस्तार अधिकारी गजानन धर्णे, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, कोमसापचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, कोमसापचे जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, प्रा.ॲड.अरुण पणदूरकर, प्रा. सुभाष गोवेकर, राजन तावडे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, रामदास पारकर, मंगल नाईक - जोशी, सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, मुख्याध्यापिका दीक्षा आडारकर, मंजूषा मांजरेकर, सौ. पाटील, सर्व  ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित नाईक, पोलीस पाटील, सर्व शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आदि उपस्थित होते.


यावेळी मळेवाड येथील बालसाहित्यिक तथा बाल साहित्य संमेलनाची अध्यक्ष वैष्णवी मिलिंद मुळीक हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, अलीकडे सोशल मीडिया वाढलेला आहे. टीव्हीवरील अनेक वाहिन्यांमुळे आमच्यासारखी अनेक मुले वाचनापासून लांब जात आहेत. मात्र तरीदेखील माझ्यासारख्या अनेक बालकांना वाचनाची  आवड आहे. आमच्या या आवडीला कोकण मराठी साहित्य परिषदेने महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. म्हणून वाचन संस्कृतीच्या दृष्टिकोनातून ही अभिनंदन ही बाब आहे, असेही मुळीक हिने सांगितले. 

प्रास्ताविक सादर करताना कोमसाप संतोष सावंत म्हणाले की, कोमसापच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी बालसाहित्य संमेलन घेण्यात येत आहे. यासाठी कोमासापाचे संस्थापक अध्यक्ष मधुभाई कर्णिक यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. आगामी काळातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून साहित्य संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सावंत यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गटविकास अधिकारी  वासुदेव नाईक गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके विस्तार अधिकारी गजानन धर्णे, साहित्यिका उषा परब यांनीही मार्गदर्शन केले.


ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

बाल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रारंभी मळेवाड  नाका येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीतून बालकांनी 'चला पुस्तके वाचूया, ग्रंथ चळवळ वाढवूया!', 'वाचाल तरच वाचाल.!' 'ग्रंथ हेच गुरु', 'पुस्तक वाचा, मस्तक सुधारेल!',  अशा घोषणा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीत पारंपरिक वेशभूषेत नटलेले चिमुकले मुले-मुली यांनी अनेकांची मने जिंकली. ढोल ताशांच्या गजरासह मळेवाड नाका येथून निघालेल्या ग्रंथ दिंडीचा समारोप जिल्हा परिषद शाळा नंबर २ येथे करण्यात आला.


बाल साहित्य संमेलनासाठी मळेवाड येथील विविध  शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बालसाहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व उपशिक्षक तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमसापच्या सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले.