
कुडाळ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरी भजनाच्या सुरात न्हाऊन निघाली. भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मुख्यमंत्री चषक भजन स्पर्धा' कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ३६ भजनी मंडळांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
या भजन स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे, तसेच संजय वेंगुर्लेकर, रणजीत देसाई, मोहन सावंत, सुरेश सावंत, सुनील बांदेकर, संध्या तेरसे, निलेश परब, श्रेया गावंडे, विकास कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले आणि भजन कलेचे महत्त्व अधोरेखित केले. भजन ही आपली संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असून, ती जपण्याची आणि वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री यांनी हिंदूंच्या हिताचे निर्णय आपल्या कारकिर्दीत घेतलेले आहे. आपली सांस्कृति भजनाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आपला महाराष्ट्र भोंगे मुक्त करण्यासाठी फडणीस साहेब यांचे मोठे योगदान आहे. आज वाढदिनानिमित्त भजन स्पर्धेचा घेतला गेलेला कार्यक्रम त्यांना साजेसा कार्यक्रम आहे. कानडे यांनी भजन मंडळ साठी चांगली कामगिरी केली सतत पाठपुरावा केला आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही न्याय देऊ. आपल्याला चांगले व्यासपीठ निर्माण करून द्यायचे काम मी करीन. भजन सदन भूमिपूजन चतुर्थीला करण्याची घोषणा पालकमंत्री यांनी या कार्यक्रमात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे भजन स्पर्धेचे आयोजन केल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती झाली. सकाळपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध भजनी मंडळांनी पारंपरिक आणि नवीन भजनांचे सादरीकरण केले. प्रत्येक मंडळाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत भजन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, भजनी कलाकार आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री चषक आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि सहभागी मंडळांचे सर्वत्र कौतुक होत आहे.