मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार : संजना सावंत

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 29, 2024 07:15 AM
views 617  views

कणकवली : विधानसभा अधिवेशन चालू असून काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं दिसून येते. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता आणि काल अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आभार मानत असल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल असेही सावंत यांनी सांगितले. खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी  संजना सदडेकर, प्राची कर्पे, करंजे सरपंच सपना मेस्त्री, मेघा सावंत, साक्षी वाळके, नागवे सरपंच सिद्धीका जाधव, प्रतीक्षा सावंत, आदी उपस्थित होत्या.  सगळ्यात महत्त्वाची योजना जी होती ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये देण्यात येणार. आणि या योजनेसाठी सरकारकडून 46000 कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे सावंत यांनी सांगितले