दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय इमारतीचे मुख्यमंत्री शिंदेंनी केलं ऑनलाईन उद्घाटन

दोडामार्ग मध्येही फित कापून भूमिपूजन कार्यक्रम
Edited by:
Published on: June 06, 2023 19:51 PM
views 74  views

दोडामार्ग : दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांच्या मुख्य इमारत बांधकामाचे भूमिपूजन मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे  व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले, आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथून दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन उदघाटन केले. दोडामार्ग तालुक्यातील या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली होती. मात्र बऱ्याच वर्षांपासून या रुग्णालयाचे काम रखडलेले होते. येथील जनतेला उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालय किंवा गोवा येथील बांबोळी व म्हापसा येथील जिल्हा रुग्णालय येथे  आपली पदरमोड करून जावे लागत आहे. त्यामुळे येथील जनतेची हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मोठी मागणी होती. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा करून 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 22 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या इमारत कामांचे यापूर्वीच काम सुरू करण्यात आले असले तरी  आज प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. येणाऱ्या काळात ही रुग्णालयाची इमारत उभी राहणार असून तालुकावासीयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी प्रमुख डॉ. सुबोध इंगळे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता संभाजी घंटे, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, नगरसेवक गौरी पार्सेकर, रामचंद्र मणेरीकर, क्रांती जाधव, स्वराली गवस, मणेरी सरपंच विशांत तळवडेकर, डॉ. रामदास रेडकर, डॉ. अक्षय रेड्डी, डॉ. शाहीन भुजवाळा, माजी सभापती दयानंद धाऊसकर, खानयाळे गावचे माजी सरपंच विनायक शेटये, सासोली सरपंच संतोष शेट्ये आदी उपस्थित होते.