मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केसरकरांच्या मागण्या 'ऑन धी स्पॉट' मान्य...!

Edited by:
Published on: June 06, 2023 15:41 PM
views 119  views

सावंतवाडी : कोट्यवधीचा विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडीत करण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या. या मागण्या मुख्यमंत्री शिंदेंनी जाग्यावर मान्य केल्या.


केसरकर म्हणाले, महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून संबोधलेल्या सावंतवाडी संस्थानाला ४०० वर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे हे वैभव टिकविण्यासाठी व अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणीचे दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वेगळे मद्यार्क धोरण राबवावे. नद्या शुद्धीकरणाचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावा. निवती येथील समुद्रकिनारी समुद्रातील जलविश्व पर्यटकांना अनुभवण्यासाठी सबमरीन उपलब्ध करून द्यावी. दोडामार्ग एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणावेत, फाईव्हस्टार हॉटेल्सचा शुभारंभ लवकर व्हावा, त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा भाजी मंडई प्रकल्पासाठी उर्वरीत १४ कोटींची रक्कमही उपलब्ध करावी अशी मागणी यावेळी केली.


 केसरकर यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून मोती तलावात अडीच कोटी रुपये लेझर शो साठी मंजूर केले. तसेच बोटिंग प्रकल्पासाठी एक कोटी मंजूर करण्यात येतील माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन केले होते. मात्र मोती तलावाच्या मध्यवर्ती हा पुतळा उभारल्यास शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल यासाठी आपण प्रयत्न करूया असं आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या माध्यमातून कबुल्यातदार गांवकर जमीन वाटप लवकरच सुरू करण्यात येईल. बांदा येथे नवीन क्रीडा संकुल उभारण्यात येईल बॅरिस्टर नाथ पै सभागृह व नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन लवकरचं होईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांच्या मागण्यांना हिरवा कंदील दाखवला. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना आमच्याकडे मांडल्या आहेत. यात नद्या पुनर्जीवन करण्याचा पायलट प्रोजेक्ट, आंबोली हिल स्टेशनचा विकास, निवती येथे समुद्रातील विलोभनीय सफर घडविण्यासाठी सबमरीन, सावंतवाडी येथील क्रीडा संकुल सोबत बांदा येथे क्रीडा संकुल त्याचबरोबर सिंधू रत्न मधून विविध योजनांसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल. पर्यटनाची एकही संधी हे सरकार सोडणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलही लवकरच मार्गी लागेल असं सांगत केसरकरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. केसरकर यांना आणखीन काही शिल्लक आहे का ? असं विचारत असेल तर राणे साहेबांना  सांगा असं विधान त्यांनी केलं.