छत्तीसगढ पोलिस कर्मच्याऱ्याचा आंबोलीत मृत्यू

दरीत कोसळल्याने गमावला प्राण
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 07, 2023 12:17 PM
views 99  views

सावंतवाडी : कर्नाटकातील विधानसभा इलेक्शनच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड वरून छत्तीसगड रिझर्व पोलीस हे कर्नाटक रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे ते पाच जण गोव्याला पर्यटनासाठी म्हणून शनिवारी सकाळी गेले होते. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास गोव्याहून पर्यटन करून परतत असताना शौचाला म्हणून ते आंबोली घाटातील धबधब्याजवळील एका वळणावर थांबले. त्यातील तिघेजण शौचासाठी उतरले. त्यातील मीतेलेश पॅकेरा (35)  हा दरीच्या दिशेने शौचालयाला गेला. परंतु शौचालयाजवळील तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300 फूट खोल खाली कोसळला.

रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं,  हे त्याच्यासोबत असलेल्याना सुद्धा कळलं नाही.  त्यांनी लागलीच आंबोली पोलीस स्थानकातील दत्तात्रय देसाई यांना संपर्क केला. देसाई यांनी आंबोली रेस्क्यू टीम व स्वतः घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ 30 मिनिटात खाली दरीत उतरत वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर, मायकल डिसोजा हे खाली पोहोचले, त्यावेळी थोडाफार प्राण त्याच्यामध्ये शिल्लक असल्याचे सांगितले, परंतु काही काळाने तो मृत्युमुखी पडला.

त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला. याबाबतची खबर त्याच्या वरिष्ठांना देण्यात आली असून त्याचे वरिष्ठ कर्नाटक येथून येण्यास रवाना झाले आहेत. आंबोली रेस्क्यू टीम मार्फत व आंबोली पोलीस स्थानक पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे, दीपक नाईक आदी यांनी घटनास्थळी जात तत्परतेने बचाव कार्यास मदत केली.