रत्नागिरीत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते मराठा महासंमेलनाचे होणार उद्या उद्घाटन

Edited by:
Published on: January 17, 2025 18:21 PM
views 40  views

रत्नागिरी : अखिल मराठा फेडरेशनतर्फे उद्या (ता. १८) व रविवारी (ता. १९) हॉटेल विवेक येथे अखिल मराठा महासंमेलन रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन उद्या सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील ७५ मराठा मंडळे यात सहभागी होणार आहेत. या निमित्त येणाऱ्या सर्व मराठा बंधू भगिनींची भोजन, नाश्त्याची व्यवस्था, कार्यक्रम, सजावट, स्मरणिका याचे नियोजन केले आहे. संमेलनात लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार असून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

संमेलनात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार, अखिल मराठा समाजभूषण पुरस्कार अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे, राज्याचे माजी मुख्य सचिव अजितराव निंबाळकर, कर्नाटकचे माजी मुख्य सचिव अरविंद जाधव आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अॅडव्हान्स इंजिनिअरिंग तज्ज्ञ उमेश भुजबळराव यांना अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

१८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता इतिहासाच्या कोंदणातून वेध मराठ्यांच्या भविष्याचा यावर चर्चासत्र होईल. यात डॉ. कमलाकर इंदुलकर, अॅड. सतीश मानेशिंदे, डॉ. अजय दरेकर, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. उज्वलकुमार चव्हाण सहभाग घेतील. संध्याकाळी 5.30 वाजता मराठा बिझनेस फोरम मिशन उद्योग यावर चर्चासत्र होणार असून यात अरुण पवार, डॉ. सुरेश हावरे, राजेंद्र सावंत, अॅड. उज्ज्वल चव्हाण, अरविंद जाधव, अॅड. सतिश मानेशिंदे, राजेंद्र घाग, केतन गावण, पंकज घाग हे सहभागी होतील. रात्री ८ वाजता आकर्षक कोकणी कलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

१९ जानेवारीला सकाळी १० वाजता आजची जिजाऊ (कर्तबगार मराठी महिला आणि त्यांच्या पुढील आव्हाने) यावर चर्चासत्र होईल. यात अस्मिता मोरे-भोसले, कविता पाटील, डॉ. ज्योती शिंदे, राधिका बराले, डॉ. स्वराली शिंदे अशा नामवंत महिला सहभागी गोतील. दुपारी १२ वाजता अभियान उद्योजकतेचे यात प्रथितयश व्यक्तीमत्व उमेश भुजबळराव, उज्वल साठे, प्रफुल्ल तावरे, केतन गावंड, राजेंद्र घाग, सुरेश कदम सहभागी होतील. महिला उद्योगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. १९ जानेवारीला ला संध्याकाळी ३ वाजता सांगता समारंभ सुरू होईल. याप्रसंगी अध्यक्षस्थान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भूषवणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, सरखेल आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नारायण राणे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच राज्याचे मंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.