बांधकाम कामगारांची एजंटांकडून फसवणूक ?

कामगारांनी तक्रार करण्याचे आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 19, 2024 08:53 AM
views 457  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना भांडी मिळवून देणार यासाठी लींकवर जावून ग्रुप मध्ये सामील व्हा असे व्हाट्सअप वर मॅसेज पाठवून काही एजंट जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची आर्थिक फसवणूक करत आहेत. या एजंटांपासून सावध राहावे व कोणीही बांधकाम कामगारांनी लींकवर जाऊन कोणत्याही एजंटांच्या ग्रुप मध्ये सहभागी होऊ नये,असे आवाहन बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे.तालुकास्तरावर वाटप होण्यासाठी भारतीय मजदूर संघाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो कामगार, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळाअंतर्ग नोंदीत आहेत.या नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत शैक्षणिक, विवाह, प्रसूती, गंभीर आजार, अपघात, मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत, मृत्यू क्लेम आदी योजनेद्वारे थेट आर्थिक लाभ मिळतात. याच बरोबर मार्च २०२४ पासून नोंदीत बांधकाम कामगारांना ३० भांड्यांचा गृहोपयोगी संच मंडळामार्फत मोफत देण्यात येत आहे. कामगारांना मंडळामार्फत देण्यात येणारे फायदे मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ काम करत आहे. परंतु कामगारांना मंडळामार्फत मिळणारे थेट आर्थिक लाभ व वस्तू रुपी लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यात काही एजंट कार्यरत आहेत. त्यांनी आपली दुकानदारी सुरू करून बांधकाम कामगारांना आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. मध्यंतरीच्या काळात याच एजंटांनी मंडळाच्या नावाने पत्रके छापून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकिय कार्यालयामध्ये बसून नोंदणी, नूतनीकरणाच्या नावाखाली कामगारांना कोणतीही पावती न देता पैसैही घेतल्याचे बोलले जात आहे. या एजंटांविरोधात कामगार अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे जवळ कारवाईसाठी तक्रारही करण्यात आली आहे. 

    लोकसभा निवडणूकी नंतर हे एजंट पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, सदर एजंट भांडी मिळणार, नोंदणी, नूतनीकरणाच्या नावाखाली मॅसेज पाठवून संपर्क साधण्यास किंवा ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगत आहेत.तरी बांधकाम कामगारांनी लुटारू एजंटांपासून सावध राहावे.भांडी संघ वाटप तालूका स्तरावर होण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्नशील असून, भांडी संच हा पूर्ण मोफत मिळणार आहे.सदर संच मिळवून देण्यासाठी किंवा हमीपत्र भरून घेण्यासाठी कोणी पैशाची मागणी केल्यास थेट सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग कार्यालय यांचेशी संपर्क साधावा व कायदेशीर कारवाईची मागणी करावी.त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यास भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री.साटम यांनी केले आहे.