दोडामार्ग–बांदा राज्यमार्गावर वीज वाहिनीचे अनागोंदी काम

भविष्यातील वाहतूकीला गंभीर धोका
Edited by:
Published on: September 25, 2025 12:28 PM
views 367  views

दोडामार्ग : बांदा–दोडामार्ग या प्रमुख राज्य मार्गावर 33 केव्ही आणि 11 केव्ही वीज वाहिनीसाठी पोल बसवण्याचे काम सुरू असून हे काम पूर्णपणे नियमबाह्य व बेफिकीर पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कामामुळे सध्या वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे, तसेच भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी मोठा अडथळा निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

हा राज्यमार्ग दोडामार्ग तालुक्याला जिल्हा मुख्यालयाशी थेट जोडतो. याच मार्गावरून मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणी मिळते. तसेच नियोजित आडाळी एमआयडीसीपर्यंत पोहोचण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. एवढ्या महत्त्वाच्या रस्त्यावर वीज विभागाकडून पोल रस्त्याच्या अगदी जवळ, सुरक्षित अंतर न पाळता बसवले जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

या मार्गाच्या दोन्ही बाजूंना आधीच एमएनजीएल इंडिया कंपनीची गॅस पाईपलाईन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी पाईपलाईन आणि दूरसंचार विभागाच्या फायबर केबल्ससाठी पोल अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. आता वीज वाहिनीसाठी उभारले जाणारे मोठ्या आकाराचे पोल रस्त्याच्या डांबरीकरणापासून फक्त अर्धा ते एक मीटर अंतरावर बसवले जात आहेत. त्यामुळे भविष्यात चौपदरीकरण किंवा रुंदीकरणाच्या वेळी हे पोल मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, बांदा–दोडामार्ग रस्त्याची देखभाल करणारे डेप्युटी इंजिनियर आणि शाखा अभियंते या धोकादायक कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. “रस्त्याच्या मध्यभागापासून आवश्यक अंतर राखूनच वीज पोल उभारावेत आणि जिथे वाहतुकीला धोका आहे, त्या ठिकाणी पोल बसवण्यास परवानगी देऊ नये,” अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

रस्ता रुंदीकरण हा काळाची गरज असल्याने बांधकाम विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन नियमानुसार सर्वेक्षण करूनच पुढील कामास परवानगी द्यावी, असे नागरिकांनी स्पष्ट केले. “वीज ही तितकीच गरजेची आहे; पण आजारापेक्षा उपचारच भयंकर ठरतील अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच हीच परिस्थिती दोडामार्ग–आयी रस्त्यावरही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.