सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हातील क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेतील पात्र झालेल्या विद्यार्थीनीवर अन्याय झाल्याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच लक्ष वेधलं आहे. याबाबत निवेदन त्यांना देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, सचिव विनोद जाधव,उपाध्यक्ष आनंद कांडरकर, महीला जिल्हाध्यक्ष सौ.मानसी परब,सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत, कणकवली तालुका सचिव मनोज तोरसकर,मनोज वारे,आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी वैष्णवी सावंत हिने चिपळून डेरवण येथील १९,२० व २१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या विभागीय स्तरीय मैदानी १०० मीटर हर्डल धावणे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन द्वितीय क्रमांक घेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. विदयालयाचे क्रिडा शिक्षक नारायण केसरकर वारंवार ओरोस येथील जिल्हा क्रिडा विभागामध्ये पुढील राज्यस्तरीय स्पर्धा केव्हा होणार याबाबत विचारणा करत होते. कार्यालयाच्या संपर्कात होते. परंतु, त्यांना रितसर शाळेच्या ई मेल वर मेल येईल असे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२६ डिसेंबर २०२४ रोजी वैष्णवी सावंत या विद्यार्थीनीला सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबतच्या कोणताही संदेश मेल किंवा लेखी स्वरूपात न कळविता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबाबतचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागी न करून घेता परस्पर सहभाग प्रमाणपत्र देणे म्हणजे हेतू पुरस्कर भाग घेवू न देण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. हे सर्व पुर्व नियोजित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या क्रिडा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणेचे गरजेचे आहे. तसेच कु. वैष्णवी सावंत या विद्यार्थीनीचे झालेल्या नुकसान भरपाई करून तिला न्याय मिळवून द्यावा व लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.