केसरकर खासदारकीसाठी मोदी, शहांचा करतायत जप : प्रवीण भोसले

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:04 PM
views 88  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. तर अर्चना घारेंना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली.

ते म्हणाले, आमच्या जिल्ह्याच्या प्रगतीत सिंहांचा वाटा शरद पवार यांचा राहीला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मला पालकमंत्री, दोनवेळा मंत्रीपद शरद पवार यांनी दिलं. फलोत्पादन योजनेतून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच काम शरद पवार यांनी केल. शरद पवार यांच्या दुरदृष्टीचा लाभ आपण आजही घेत आहोत. आम्हाला मिळालेले आमदार फक्त मंत्रीपद गाठतात. विश्वास मिळवून मंत्री होतात आणि नंतर घात करतात असा टोला त्यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता लगावला. एकनाथ शिंदेंनी यांना मंत्री केलं‌. पण, आता खासदारकीसाठी मोदी शहांचा जप ते करत आहेत असा हल्लाबोल केला. आपल्याला काम करणारा आमदार हवा आहे. अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून तो आमदार जनतेला मिळू शकतो. त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते