चंदगड-दोडामार्ग-पणजी एसटी मंगळवारपासून सुरू होणार

Edited by: लवू परब
Published on: July 29, 2025 18:28 PM
views 32  views

दोडामार्ग : चंदगड आगाराची चंदगड-दोडामार्ग-पणजी ही एसटी बस फेरी मंगळवारपासून सुरू होणार आहे. याबाबतचे अधिकृत पत्र चंदगड आगार व्यवस्थापकांनी शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो यांना दिले आहे. या बस फेरीमुळे अनेक प्रवाशांची होणारी गैरसोय मात्र आता दूर होणार आहे.

गतवर्षी तिलारी घाटातून एसटी सह अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पारित केला. त्यानंतर तब्बल आठ महिने एसटी सेवा बंद राहिली. परिणामी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. अखेर घाटातून एसटी बस सुरू झाल्या. मात्र अनेक बस फेऱ्या बंद पडल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद पडलेली एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र चंदगड-दोडामार्ग-बेळगाव ही  बस सेवा बंदच राहिली. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी. प्रवाशांचे हाल होऊ लागले. ही बस सेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो आणि हेवाळे ग्रामपंचायत सदस्य समीर देसाई यांनी ३० जुलै रोजी उपोषण छेडण्याचा इशारा चंदगड आगार व्यवस्थापकांना दिला होता. मात्र अपुऱ्या गाड्या व मनुष्यबळाचे सब पुढे करत कोल्हापूर आगाराच्या एसटी बस सुरू असल्याचे चंदगड आगार व्यवस्थापकांनी मायकल लोबो व समीर देसाई यांना पत्राद्वारे कळविले. शिवाय चंदगड आगाराच्या कार्यक्षम कक्षेत मर्यादित संसाधनांमुळे सध्या नवीन बस सेवा सुरू करणे किंवा थांबवलेली सेवा पूर्ववत करणे तात्काळ शक्य होत नसल्याचे १९ जुलै रोजी कळविले.

मात्र प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गे बस सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याने मायकल लोबो यांनी ही सर्व कैफियत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना सांगितली. त्यांनी तात्काळ बस फेरी सुरू करण्याच्या सूचना चंदगड आगार व्यवस्थापकांना दिल्या. त्यामुळे मंगळवारपासून चंदगड-दोडामार्ग-पणजी ही बस फेरी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र आगार व्यवस्थापकांनी मायकल लोबो यांना दिले.