
सावंतवाडी : महाराष्ट्राच देवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छ. शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही होते असे प्रतिपादन शिवचरित्रकार व हिंदवी परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे संस्थानकालीन राजवाडा येथे डॉ. शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शेटे यांच्या व्याख्यानाचे हे सातवे पुष्प होते. दरवर्षी शिवव्याख्यानाच आयोजन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे केलं जातं. या पुष्पात डॉ. शेटे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेचं ओघवत्या शैलीत विवेचन केलं. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे लखमराजे सावंत-भोसले, श्रद्धाराजे भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, वीज वितरण कंपनीचे निवृत्त उपअभियंता सोमनाथ जिगजिन्नी, माजी नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते.
हिंदुस्थानची परंपरा रघु रामचंद्रांपासून सुरू झाली होती. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सुरू ठेवण्यासाठी दिग्विजय मोहीम दक्षिणेत सुरू केली. महाराजांनी कोकणातून दक्षिणेत प्रवेश केला. दक्षिणेतील हिंदुंना मोगलांकडून त्रास होत होता. अशावेळी महाराजांनी दक्षिण दिग्विजियाची मोहीम आखल्याने दक्षिणेतील हिंदुंना दिलासा मिळाला होता. तामिळ, तेलगू, आंध्रच्या जनतेला महाराजांबद्दल विश्वास वाटला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील जिंजी, वेल्लूर असे किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेकडच्या मोहिमेत युद्धाबरोबर अध्यात्मिकतेची जोड होती. तर शिवाजी महाराजांवर जिजाऊंचे संस्कार होते. आजच्या काळातही असे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या मुलावर बिंबवले पाहिजेत. आज मोबाईलमध्ये मुले अडकली आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता वाटते. पालकांनी या मुलांना बोधकथा, संस्कारकथा सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी आपणही वाचन केले पाहिजे. मुलांना यातून बाहेर काढले पाहिजे. तरच त्यांचे भवितव्य घडेल असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठानतर्फे व्यावसायिक के. के. शेट्टी, एक्स्पर्टो बेकरीचे योगेश नायर, निवृत्त उपअभियंता सोमनाथ जिगजिन्नी यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत प्रतिष्ठानचे दीपक गावकर यांनी केले.