
मालवण : भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा केला जाणारा 'वाचन प्रेरणा दिन' शासकीय तंत्रनिकेतन मालवणमध्ये अतिशय दिमाखात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने व डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रा. संजय तलवारे यांनी केली.
त्यानंतर संस्थेचे मराठी भाषा अधिकारी प्रा. सचिन राजाध्यक्ष यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश विशद केला. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. कलाम यांचे विविध वैज्ञानिक व साहित्यिक पैलू उलगडले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी संख्यात्मक व गुणात्मक शिक्षणातील फरक, दस्तूरखुद्द डॉ. कलाम यांच्या 'अग्निपंख' या पुस्तकातील लेख, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, या व अशा इतर विविध विषयांवरील लेखांचे अतिशय परिणामकारक वाचन केले. सदर लेखांचे सुयोग्य समीक्षण केले.
प्रा. राजेंद्र पेंदाम यांनी आपल्या भाषणात वाचनाचे आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांविषयी विस्तृत विवेचन केले. तसेच आजच्या सोशल मीडियाच्या युगातही विद्यार्थ्यांना आपल्या माय मराठी विषयी असलेल्या आस्थेचे कौतुक केले. संस्थेतील प्रा. दत्तप्रसाद गोलतकर, डॉ. योगेश महाडिक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. राजाध्यक्ष यांनी फावल्या वेळेत पुस्तकाचे किंवा वर्तमानपत्रांचे वाचन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले व तीच डॉ. कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीचा युवा कवी विराज कोरगावकर याने केले.
शास्त्र विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री विकास पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, सुरक्षारक्षक व सफाई कर्मचारी या सर्वांच्या मौलिक सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या अतिशय दिमाखात साजरा झाला.