काजु बी ला प्रती किलो १३५ रुपये एवढा दर दिला जाईल : दीपक केसरकर

Edited by:
Published on: March 10, 2024 14:05 PM
views 313  views

दोडामार्ग : प्रथमच सरकार तर्फे येत्या दोन ते तीन दिवसात काजू बी खरेदी करण्याची सुरुवात केली जाणार असून काजु बी ला प्रती किलो १३५ रुपये एवढा दर शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी ग्वाही स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काजू बागायतदार शेतकरी काजू बी हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन, मोर्चे करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही असाच मोर्चा दोडमार्ग येथे झाला. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, माझाही माझ्या शेतकरी बांधवावर पूर्ण लक्ष आहे. 

काजुचा दर हा सध्या कोसळलेला असून शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे प्रथमच सरकार तर्फे काजू बी खरेदी केली जाणार असून १३५ रुपये प्रति किलो दर ही देण्यात येणार आहे. शिवाय मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात दुपारी १२ वाजता काजू बागायतदार शेतकऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच त्या ठिकाणी काजू च्या बोंडावर करणारी युनिट मंजूर केली जाणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट करत कोंकण कृषी विद्यापीठाकडून हे युनिट वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला काजू बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही श्री. केसरकर म्हणाले. शिवाय खरेदी केलेल्या काजू बी साठी विनामूल्य स्वरूपात गोडवाऊन देण्याची तयारी जिल्ह्यातील कारखानदारांनी दर्शविली आहे. शिवाय पणन मंत्री व कृषी मंत्री यांच्यासोबतही विशेष बैठक काजू संदर्भात संपन्न झाली आहे. 

केसरकर घेणार महत्वपूर्ण बैठक

सोमवारी मंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबई येथील बंगल्यावर विशेष बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये ब्राझील मधील काजू च्या बोंडू वर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान आत्मसात असलेले तेथील तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत यशस्वी वाटाघाटी झाल्या तर काजू पासून शेतकऱ्यांचे उत्पादन  वाढविण्यासाठी त्याचा फायदा होईल असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.