
दोडामार्ग : दोडामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन छेडून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू बी दराबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधणे व तरीही शासनाने काजू बागायतदार यांना न्याय न दिल्यास आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे असा मोठा निर्णय सिंधुदुर्ग काजू उत्पादक बागायदार संघ व शेतकऱ्यांनी घेतला आहे.
काजू बी ला २०० रू. हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधूनही अपेक्षित निर्णय न झाल्याने पुढील निर्णय घेण्यासाठी रविवारी येथील महालक्ष्मी सभगृहात दोडामार्ग व सावंतवाडी येथील जिल्हा काजू बागायतदार संघाच्या पदाधिकारी व काजू उत्पादक यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आता आर या पार ची लढाई लढण्याचा निर्धार काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. इतकचं नव्हे कोणी शेतकऱ्यांना स्वस्तात घेऊ नये एकट्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात तब्बल १५ हजार काजू उत्पादक शेतकरी आहेत. या सर्वांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यास लोकशाहीत काय होऊ शकते याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी या बैठकीनंतर पदाधिकारी यांनी केली आहे.
गेल्या चार वर्षात २०१९ पासून काजू दर 110 ते 120 रुपये पर्यंत खाली आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. तर या दरात स्थिरता यावी, काजू बी ला योग्य दर मिळावा यासाठी मागील वर्षभरापासून सर्व लोकप्रतिनिधींकडे मागणी करून, निवेदने देऊन, मंत्र्यांशी चर्चा करून काही निष्पन्न न झाल्याने शेतकरी सनदशीर मार्गाने अनेक प्रकारची आंदोलन करण्यास उद्युक्त झाले. त्याचाच एक भाग म्हणून 16 फेब्रुवारी रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर व रत्नागिरी येथे प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर काजू उत्पादक शेतकऱ्यांना यशस्वी धरणे आंदोलन केले.
त्यानंतर राज्य सरकारने 21 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित दादा पवार यांनी कॅबिनेट बैठक घेतली. खर तर या बैठकीवर शेतकऱ्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांचा काजू बी ला हमीभाव हा मुख्य मुद्दा होता. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वकष विकासासाठी धोरण ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असली तरी त्यातून काजू कारखानदारांसाठी फायद्याचे निर्णय जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांनी ज्या काजू बी हमीभाव साठी आंदोलन केली त्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा न करता मंत्र्याच्या बैठकीत कारखानदार यांना परदेशी काजू बी खरेदी साठी प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा शेतकऱ्यांत तीव्र भावना होत्या.
याच पार्श्व भूमीवर आज रविवारी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू बाबत सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी व शासनावर दबाव आणण्यासाठी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठेवण्यासाठी श्री महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे शेतकरी व फळ बागायतदार संघ सावंतवाडी - दोडामार्गचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुढील निर्णय एकमताने संमत करण्यात आले १) दोडामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन करणे २) येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू बि दरा बाबत सकारात्मक निर्णय जाहीर न झाल्यास येत्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे ३) जिल्हा परिषद विभाग निहाय प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांना जागृत करून आंदोलनात प्रवृत्त करणे असे ठोस निर्णय घेण्यात आले आहे. मुळातच शासनाने शेतीपासून दूर चाललेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेळीच सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे असा सडेतोड इशारा देण्यात आला आहे. या बैठकीला अध्यक्ष
विलास सावंत, दिवाकर मावळणकर अजित देसाई, प्रवीण परब, लाडू गवस, बाबाजी नाईक, अमित सावंत संजय देसाई, चंद्रशेखर देसाई, नारायण गावडे, मोहन दळवी, आकाश नरसुले, लक्ष्मण नाईक, संतोष देसाई, गोपाळ सावंत, राजन देसाई, सुनील सावंत, शरद सावंत यांसह तालुक्यातील काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.